(मुंबई)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, याचा सर्वात मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. अजित पवार यांची अकाली एक्झिट आणि शरद पवारांचे वाढते वय लक्षात घेता, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससमोर नेतृत्वाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर अजितदादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या विलिनीकरणाची चर्चा जोर धरू लागली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका संपल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची दाट शक्यता असल्याचे संकेत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून दिले जात आहेत. दोन्ही गटांतील आमदार, खासदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांमध्ये विलिनीकरणाबाबत सकारात्मक भावना असल्याचे चित्र आहे.
याआधी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गटाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. जरी निवडणूक वेगवेगळ्या चिन्हांवर लढवली असली, तरी स्थानिक पातळीवर समन्वय दिसून आला. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही अनेक ठिकाणी दोन्ही गट अप्रत्यक्षपणे एकत्र लढत असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विलिनीकरणाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, आता सत्य बोलण्याची वेळ आली आहे. महापालिका निवडणुकीनंतर एकत्र येण्याबाबत अजित पवार यांनी स्वतः संकेत दिले होते आणि त्या अनुषंगाने बैठका देखील झाल्या होत्या. अजित पवार हे शरद पवारांकडे पाहूनच हे बोलत होते. त्यामुळे आता त्याच दिशेने आमची पुढची वाटचाल असेल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनीही विलिनीकरणाबाबत भूमिका मांडली आहे. दोन्ही राष्ट्रवादी आता प्रत्यक्षात एकत्रच आहेत. वेगळे राहून पुढे जाणे शक्य नाही, एकत्रच राहावे लागेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
शरद पवारांची भूमिका काय?
दोन्ही गटांकडून विलिनीकरणासंदर्भात सकारात्मक वातावरण असले तरी शरद पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. विलिनीकरणाला त्यांचा थेट विरोध नसल्याचे संकेत मिळत असले, तरी भाजपसोबत जाण्याबाबत ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. शरद पवार सक्रिय राजकारणातून हळूहळू दूर राहत असले, तरी विलिनीकरणाच्या प्रक्रियेला ते अडथळा आणणार नाहीत, असे शरद पवार गटातील नेत्यांचे म्हणणे आहे.
नेतृत्व कुणाकडे जाणार?
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण झाल्यास पक्षाचे नेतृत्व कोणाकडे जाणार, यावरही चर्चा रंगली आहे. शरद पवार स्वतः पुन्हा सूत्रे हाती घेण्याची शक्यता कमी मानली जात आहे. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार तसेच युगेंद्र पवार हे अद्याप अनुभवाच्या टप्प्यावर असल्याने लगेचच पक्षाचे नेतृत्व सांभाळू शकतील, अशी शक्यता कमी आहे.
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची नावे चर्चेत असली, तरी पवार कुटुंबाबाहेर पक्षाची धुरा जाण्याची शक्यता फारच कमी असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे या दोघींकडे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची जबाबदारी येण्याची दाट शक्यता पक्षातील जबाबदार नेते व्यक्त करत आहेत.
अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या या नव्या राजकीय समीकरणांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याचा निर्णय येत्या काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे.

