(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव मुरलीधरआळी येथे बंद बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ६ लाख ३४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. ७ नोव्हेंबर) रात्री उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
यापूर्वीच काही दिवसांपूर्वी तालुक्यातील करंजारी येथेही अशाच प्रकारे बंद घर फोडून चोरट्यांनी तब्बल १२ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. त्यामुळे तालुक्यातील चोरीच्या घटना वाढल्याने पोलिसही अधिक सतर्क झाले आहेत.
देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अजय पर्शराम पांचाळ हे सुट्टीमध्ये मुंबईला गेले होते. त्यांचे घर १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या काळात बंद होते. गुरुवारी मध्यरात्री मुंबईहून परतल्यावर घराच्या मागील दरवाज्याची कडी तुटलेली दिसली. आत शिरून पाहिल्यावर कपाटे फोडून ठेवलेली आणि सर्व दागिने व रोख रक्कम गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चोरट्यांनी दोन बेडरूममधील लोखंडी कपाटे व देवघरातील लाकडी कपाट फोडून लाँकरमधील सोन्याचे ब्रेसलेट, चार अंगठ्या, मंगळसूत्र, बुगडी, बोरमाळ तसेच २५ हजार रुपये रोख रक्कम चोरीस नेल्याचे निष्पन्न झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी शुक्रवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक उदय झावरे, उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे, तसेच हे. काँ. नितीन जाधव, महिला पोलीस मनस्वी पावसकर आदी उपस्थित होते.
तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, श्वानपथक, ठसेतज्ज्ञ व फॉरेन्सिक लॅब पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

