( दुबई )
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीनं (UAE) मोठा निर्णय घेत पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या संघटनेतून (OPEC) बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. यूएई 1 मे 2026 पासून OPEC मधून अधिकृतपणे बाहेर पडणार असल्याची माहिती सरकारी वृत्तसंस्था WAM मार्फत देण्यात आली.
‘ओपेक’ ही तेल निर्यातदार देशांची संघटना आहे. तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन, पुरवठा आणि किमतींवर नियंत्रण ठेवण्याचे काम ‘ओपेक’ करते. त्यामुळे जगभरातील तेलाच्या किमती स्थिर असतात. कोणत्याही देशाला मनमानी करता येत नाही.
यूएईने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हा निर्णय देशाच्या दीर्घकालीन आर्थिक आणि ऊर्जा धोरणाचा भाग आहे. देशांतर्गत ऊर्जा उत्पादनात वाढ, गुंतवणूक आणि बदलत्या जागतिक ऊर्जा बाजारपेठेनुसार अधिक लवचिक भूमिका घेण्यावर भर दिला जात आहे.
ऊर्जा बाजारावर परिणाम होण्याची शक्यता
हा निर्णय अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव वाढला आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीतील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून जागतिक स्तरावर तेलाच्या किमती वाढत आहेत. जगातील सुमारे 20 टक्के कच्चे तेल आणि द्रवीकृत नैसर्गिक वायू या मार्गे वाहतूक होत असल्याने या भागातील अस्थिरतेचा थेट परिणाम ऊर्जा बाजारावर होत आहे. यूएईच्या या निर्णयामुळे इंधन पुरवठा साखळी आणखी विस्कळीत होणार असून तेल व गॅस महागण्याची शक्यता आहे. यूएईच्या या निर्णयामुळे इंधन पुरवठा साखळी आणखी विस्कळीत होणार असून तेल व गॅस महागण्याची शक्यता आहे.
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. यूएईच्या या निर्णयाचे भारतासाठी संमिश्र परिणाम होऊ शकतात. संयुक्त अरब अमिरात ओपेकमधून बाहेर पडणं भारत आणि चीन सारख्या मोठ्या तेल खरेदीदार देशांसाठी ही मोठी घटना आहे. ओपेक संघटनेत फूट पडल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत अनिश्चितता येईल. यूएई ओपेकमधून बाहेर पडल्यानं क्रूड ऑईलच्या दरात तेजी आणि घसरणही पाहायला मिळू शकते. यूएई आता ओपेकच्या अटींपासून मुक्त झाल्यामुळे भारताला थेट आणि सवलतीच्या दरात तेल मिळण्याची शक्यता आहे.
सौदी अरेबियासोबत मतभेद?
यूएई आणि सौदी अरेबिया यांच्यात आर्थिक धोरणे तसेच येमेनमधील हौथी बंडखोरांविरोधातील लष्करी कारवाईवरून मतभेद वाढत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर यूएईचा OPEC मधून बाहेर पडण्याचा निर्णय अधिक महत्त्वाचा मानला जात आहे.
अमेरिकेची टीका
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी OPEC देशांवर तेलाच्या किमती वाढवून जागतिक अर्थव्यवस्थेवर ताण आणल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आखाती देशांना मिळणाऱ्या अमेरिकन लष्करी मदतीचा संबंध तेलाच्या किमतींशी जोडत, OPEC देशांनी या परिस्थितीचा गैरफायदा घेतल्याचे म्हटले आहे.
जागतिक परिणामांवर नजर
यूएईच्या या निर्णयामुळे OPEC संघटनेला मोठा धक्का बसला असून जागतिक ऊर्जा बाजार, तेलाचे दर आणि आर्थिक समीकरणांवर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही महिन्यांत तेलाच्या किमती आणि पुरवठा यावर या निर्णयाचा थेट प्रभाव दिसून येऊ शकतो.

