( अलिबाग )
दागिन्यांच्या हव्यासातून एकटी राहत असलेल्या वृद्ध महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील आलिबाग तालक्यातील चौल ग्रामपंचायत हद्दीतील टेकाळकर आळी येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंदा प्रमोद म्हात्रे (वय ७०) असे मृत महिलेचे नाव आहे. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी दागिने हिसकावण्याच्या प्रयत्नात झालेल्या झटापटीत त्यांचा जीव घेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. ही घटना रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
मंदा म्हात्रे गेल्या दहा वर्षांपासून टेकाळकर आळी येथील आपल्या माहेरच्या मालमत्तेची देखरेख करण्यासाठी घरात एकट्याच राहत होत्या. त्यांचे पती प्रमोद शांताराम म्हात्रे हे अलिबाग तालुक्यातील गुंजीस येथे वास्तव्यास आहेत. २८ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत पती-पत्नींमध्ये दूरध्वनीवर संपर्क झाला होता. मात्र, त्यानंतर फोन लागत नसल्याने पतींना संशय आला.
दिवसभर संपर्क न झाल्याने रात्री सुमारे आठ वाजता प्रमोद म्हात्रे टेकाळकर आळी येथील घरी पोहोचले. घराच्या पाठीमागील दरवाजा उघडा असल्याचे दिसताच अनर्थाची शंका बळावली. घरात प्रवेश केल्यानंतर मंदा म्हात्रे स्वयंपाकघरात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या. तातडीने तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलीस, श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक पाहणीत मृत महिलेच्या डाव्या कानाखाली जखम, तर मानेच्या उजव्या बाजूला दोन वळ (खुणा) स्पष्टपणे आढळून आल्या. त्यांच्या कानातील सोन्याच्या रिंगा आणि गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीने काढून नेण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दागिने लुटताना झालेल्या झटापटीतच हत्या झाल्याचा ठोस संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी फिर्यादी प्रमोद शांताराम म्हात्रे यांच्या तक्रारीवरून रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा गु.रजि. नं. १२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१), ३११ आणि ३३१ (७) अंतर्गत नोंदविण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. के. जाधव करीत आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच पोलीस उपनिरीक्षक भैरू किसन जाधव, दीपक म्हशीळकर, मनीष ठाकूर, सिद्धेश म्हात्रे, कुंभार, सुग्रीव गव्हाणे आणि सुधीर पाटील यांच्या पथकाने तपासाला गती दिली आहे.
या घटनेने नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, आरोपींचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.

