( पंढरपूर )
माघी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त गुरुवारी (दि. 29 जानेवारी) पंढरपूरमध्ये भक्तीचा महासागर उसळला असून राज्यासह देशाच्या विविध भागांतून तीन लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले. पहाटेपासूनच वारकऱ्यांनी चंद्रभागा नदीत पवित्र स्नानासाठी मोठी गर्दी केल्याने संपूर्ण नदी परिसर भाविकांनी फुलून गेला होता. टाळ-मृदंगाचा निनाद, हरिनामाचा अखंड गजर आणि संतांच्या पालख्यांची नगर प्रदक्षिणा यामुळे पंढरी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
माघी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे आणि प्रभारी व्यवस्थापक संदेश भोसले यांच्या हस्ते संपन्न झाली. माघ यात्रेसाठी गेल्या चार दिवसांपासून भाविक पंढरपुरात दाखल होत होते आणि एकादशीच्या दिवशी या गर्दीने उच्चांक गाठला. दर्शनासाठी भाविकांना अडचण येऊ नये, यासाठी मंदिर समितीने रिद्धी-सिद्धी गणपती मंदिराजवळ अतिरिक्त आठ दर्शन मंडप उभारले होते. येथे भाविकांसाठी चहा, नाश्ता आणि भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
नदीपलीकडील ६५ एकर क्षेत्रावरील भक्तीसागर येथे प्रशासनाच्या वतीने सुमारे दोन लाखांहून अधिक भाविकांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी चोवीस तास पिण्याचे पाणी, वीजपुरवठा तसेच आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. माघी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या बाजारपेठेतही मोठी गर्दी दिसून आली. भाविकांनी धार्मिक साहित्य, पूजेच्या वस्तू आणि घरगुती वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याने बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल झाली.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या स्वरूपात तब्बल १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर नजर ठेवण्यात आली होती. दर्शन रांगा आणि दर्शन मंडपांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये आणि लाईव्ह दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रशासनाचे नियोजन, मंदिर समितीची तयारी आणि वारकऱ्यांचा शिस्तबद्ध भक्तिभाव यामुळे माघी एकादशीचा सोहळा शांततेत, उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

