(ठाणे)
तीन वेळा नगरसेवक राहिलेले अरुण गीध यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने कल्याणमध्ये पुन्हा एकदा शिवसेना–भाजप संघर्ष उफाळून आला आहे. पक्ष फोडाफोडीच्या मुद्द्यावरून आधी शांत झालेलं वातावरण आता पुन्हा तापू लागल्याचं चित्र आहे.
काही आठवड्यांपूर्वी राज्यभरात शिवसेना आणि भाजप यांच्यातील पक्षप्रवेशांवरून मोठा वाद निर्माण झाला होता. या तणावाचे पडसाद थेट दिल्लीपर्यंत उमटले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते प्रवेश न देण्याचा अलिखित करार केल्याने तणाव निवळला होता. मात्र अरुण गीध आणि त्यांच्या भगिनी वंदना गीध यांच्या शिवसेना प्रवेशामुळे हा वाद पुन्हा चिघळला आहे.
आरोप–प्रत्यारोपांना सुरुवात
कल्याण पश्चिमेतील भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी या पक्षप्रवेशावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “जर शिवसेनेकडून अशा प्रकारे पाठीत खंजीर खुपसण्याचं काम सुरू राहिलं, तर आम्हालाही आमची भूमिका बदलावी लागेल,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या अलिखित कराराची आठवण करून देत, “असा करार असताना गीध यांचा प्रवेश कसा घेण्यात आला?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
याला प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यावर खोचक टीका केली. “नरेंद्र पवार कोण?” असा सवाल उपस्थित करत, हा प्रकार केवळ टीआरपी वाढवण्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला.
युतीत सर्व काही आलबेल नाही?
माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आणखी दावा करत सांगितले की, “आमच्याकडेही शिवसेनेचे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर येथील अनेक नगरसेवक प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत.” या वक्तव्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शिवसेना–भाजप युतीत सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अरुण गीध व त्यांच्या भगिनींच्या शिवसेना प्रवेशाबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. मात्र या पक्षप्रवेशानंतर भाजपाकडून व्यक्त होत असलेली नाराजी पाहता, येत्या काळात ठाणे जिल्ह्यातील राजकारण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

