(रत्नागिरी)
गेल्या आठवड्यात जिल्हाभरात थंडीने काहीशी पाठ फिरवली होती. मात्र, उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव पुन्हा वाढू लागल्याने मंगळवारपासून रत्नागिरी जिल्ह्यात गार वाऱ्यांची चाहूल लागली असून थंडीचा जोर वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बुधवारी दिवसभर वातावरणात गारवा कायम राहिला. सायंकाळनंतर थंडी अधिक जाणवू लागली असून रात्रीही गारठ्याचा अनुभव नागरिकांना आला.
गेल्या काही दिवसांत थंडीचा कडाका ओसरल्याने हिवाळा संपण्याच्या मार्गावर असल्याची भावना निर्माण झाली होती. तापमानात हळूहळू वाढ होत असतानाच थंडीने पुन्हा एकदा ‘कमबॅक’ केल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रात उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे कडाक्याची थंडी पुन्हा जाणवू लागली असून जानेवारी २०२६ च्या सुरुवातीपासून अनेक भागांत तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात आहे. नाशिक, धुळे व उत्तर महाराष्ट्रातील भागांत गारठा वाढला असून कोल्हापूर, पुणे, मुंबईसह कोकण किनारपट्टीवरही पहाटे धुके आणि हुडहुडी भरणारी थंडी जाणवत आहे. मंगळवारी सायंकाळपासून गार वारे वाहू लागले होते. बुधवारी दिवसभर वाऱ्यांमुळे उन्हाचा कडाका कमी भासत होता. सायंकाळीही हवेत गारवा जाणवत राहिला.
सध्या जिल्ह्यात कमाल आणि किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसची घट झाली आहे. बुधवारी कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कायम राहिल्यास येत्या आठवडाभरात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांना पुढील काही दिवस थंडीचा सुखद अनुभव घेता येणार आहे. ग्रामीण भागांत फेब्रुवारी महिन्यापर्यंत थंडीचा मुक्काम राहण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, हवामानातील या बदलांचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे चित्र आहे. सर्दी, खोकला, तापसरी यांसारख्या आजारांमध्ये वाढ होत असून याचा फटका बालके आणि ज्येष्ठ नागरिकांना अधिक बसत आहे. त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

