(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील वरचे वरवडे मिस्त्रीवाडी येथील जुन्या पुलाजवळ मोठा वाघ/बिबट्या दिसल्याने धरण कर्मचारी केतन लिंगायत यांचा जीव अक्षरशः मुठीत आला. सुदैवाने त्यांनी चातुर्याने परिस्थितीतून सुटका करून आपला जीव वाचवला. या घटनेनंतर कळझोंडी–वरवडे परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, वन खात्याने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.
घटना कशी घडली?
दररोजप्रमाणे केतन लिंगायत हे रात्री साडेसातच्या सुमारास दुचाकीवरून नाईट ड्युटीसाठी कळझोंडी धरणावर जात होते. तेव्हा मिस्त्रीवाडी पुलाजवळ अचानक मोठा वाघ/बिबट्या लाल डोळे करून उभा दिसला. दुचाकीच्या हेडलाईटच्या प्रकाशात समोर प्राणी दिसताच केतन यांची भंबेरी उडाली. काही क्षण पुढे जावे की मागे, या संभ्रमात ते क्षणभर तेथेच थांबले. मात्र भानावर येत, आणि चातुर्य दाखवत त्यांनी दुचाकी वळवून जवळच्या गणेश मोरे यांच्या घरी धाव घेतली.
भयभीत अवस्थेत घरी पोहोचल्यावर गणेश मोरे यांनी त्यांना पाणी देऊन शांत केले व धीर दिला. नंतर स्वतः दुचाकी घेऊन केतन यांना सुरक्षितपणे धरणावर पोहोचवले. या प्रसंगात गणेश मोरे यांनी दाखवलेली सामाजिक जाणीव व तत्परता याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
परिसरातील वाढते हल्ले
गेल्या चार-पाच वर्षांत कळझोंडी–वरवडे परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यामुळे अनेक जनावरे बळी पडली आहेत. गायी, बैल, वासरे तसेच कुत्र्यांवर वारंवार हल्ले झाले असून, काही शेतकऱ्यांना वनविभागाकडून नुकसानभरपाईही देण्यात आली आहे. अलीकडेच सार्थक पवार यांचा व हरिचंद्र पवार यांचा पाळीव कुत्रा बिबट्याने घरातून ओढून नेल्याची घटना घडली आहे.
स्थानिकांचा भीती आहे की, बिबट्याने जाण्या येणाऱ्या ग्रामस्थांवर हल्ला केला, तर मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे कळझोंडी–वरवडे परिसरातील बिबटे व तत्सम वाघांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेतील कर्मचारी यांनी केली आहे. सैतवडे, चाफेरी, आगरनरळ या भागातही बिबट्यांचा मुक्त वावर असल्याचे स्थानिक, तसेच दररोज संध्याकाळ नंतर प्रवास करणारे प्रवासी सांगतात.

