(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील एकही बालक पोलिओ प्रतिबंधक लसीपासून वंचित राहू नये, या उद्देशाने रविवारी रत्नागिरीतील झाडगाव येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. माधव ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, जिल्हा प्रशिक्षण पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शरण काठोळे, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कांबळे, सार्वजनिक आरोग्य परिचारिका श्वेता तारये, प्रिया पेडणेकर, प्रकाश पडगे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि बालकांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्यात आले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पालकांना पोलिओ प्रतिबंधासाठी लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगत मोहिमेत सक्रिय सहभागाचे आवाहन केले.
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी पोलिओमुक्त समाजाच्या उभारणीत प्रत्येक पालकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब आवर्जून पाजावेत, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचल्यासच पोलिओमुक्त समाजाचे स्वप्न साकार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

