(नवी मुंबई)
सिडकोमधील भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. घराच्या ट्रान्सफर नोंदीसाठी 4 लाख रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर 2 लाख रुपये स्वीकारणाऱ्या सिडकोच्या सहायक वसाहत अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुधवारी दुपारी सापळा रचून कारवाई केली. लाच स्वीकारणाऱ्या खासगी व्यक्तीसह संबंधित अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून, दोघांविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर येथील एका नागरिकाने दिलेल्या तक्रारीवरून नवी मुंबई ACBने ही कारवाई केली. तक्रारदाराने जून 2025 मध्ये आपल्या घराच्या ट्रान्सफरसाठी ऑनलाईन अर्ज केला होता. या प्रक्रियेसाठी सिडकोचे विभागीय सहायक वसाहत अधिकारी शैलेश घरत (वय 57) यांनी थेट 4 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर 2 लाख रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदाराने याबाबत नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किरणकुमार वाघ आणि अरुंधती येळवे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. प्राथमिक पडताळणीत शैलेश घरत यांनी थेट लाच न घेता खासगी व्यक्तीमार्फत पैसे स्वीकारण्याची व्यवस्था केल्याचे स्पष्ट झाले.
यानुसार बुधवारी दुपारी नेरूळ रेल्वे स्थानकाबाहेर सापळा रचण्यात आला. यावेळी नागेंद्र तुलसीराम पांडे (वय 58) या खासगी व्यक्तीला घरत यांच्या वतीने 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर ACBच्या पथकाने नेरूळ येथील सिडको कार्यालयातून शैलेश घरत यांनाही ताब्यात घेतले.
या प्रकरणी शैलेश घरत आणि नागेंद्र पांडे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंध कायद्यानुसार नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घरत यांच्या निवासस्थानी झडती घेण्याची कारवाई रात्री उशिरा करण्यात आली. या कारवाईमुळे सिडको आणि नवी मुंबईतील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

