(मुंबई)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली आहे. अजित दादांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यात काल तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश दिले असून, 28 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत संपूर्ण राज्यात अधिकृत दुखवटा पाळला जाणार आहे.
अपघाताच्या दिवशी, म्हणजे 28 जानेवारी रोजी, राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा तसेच महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. मात्र, राजकीय शोक म्हणजे सर्वसाधारण सुटी नसून, प्रशासनिक कामकाज सुरूच राहणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे 29 आणि 30 जानेवारी रोजी सरकारी कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहतील. तसेच शाळा आणि महाविद्यालयांचे वर्गही नियमितपणे भरतील.
पालकांमध्ये संभ्रम, सरकारकडून खुलासा
राजकीय शोक जाहीर झाल्यानंतर शाळांना सुटी आहे की नाही, याबाबत पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यावर शिक्षण विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना केवळ बुधवारी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली होती.
सुटीचा आदेश उशिरा प्राप्त झाल्यामुळे सकाळच्या सत्रातील काही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी आपले नियमित सत्र पूर्ण केले. दुपारच्या सत्रातील शाळांना मात्र शासनाच्या सूचनेनंतर सुटी देण्यात आली. गुरुवारपासून शाळा आणि महाविद्यालयांचे वर्ग नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राजकीय शोकाचे नियम काय आहेत?
राजकीय शोकाच्या काळात काही ठराविक नियम पाळले जातात.
• राष्ट्रध्वज अर्ध्यावर: तीन दिवसांच्या कालावधीत राज्यातील सर्व शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील.
• सरकारी कार्यक्रम रद्द: या काळात राज्य सरकारकडून कोणतेही अधिकृत सांस्कृतिक, मनोरंजन किंवा सार्वजनिक उत्सव आयोजित केले जाणार नाहीत.
• शासकीय अंत्यसंस्कार: आज, 29 जानेवारी रोजी, बारामती येथे अजित पवार यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अंत्ययात्रेच्या वेळी निधन झालेल्या व्यक्तीच्या पार्थिवावर देशाचा राष्ट्रध्वज ठेवला जातो. अंत्यसंस्कारपूर्वी राष्ट्रध्वज काढून सन्मानपूर्वक व्यक्तीच्या नातेवाईतांकडे सुपूर्द केला जातो. निधन झालेल्या व्यक्तीला लष्करी सन्मानात मानवंदना देण्यात येते. यावेळी पोलिस दलाकडून बंदुकीतून हवेत गोळ्या झाडून सलामी दिली जाते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, राज्यभरातून त्यांच्या कार्याची आठवण काढत श्रद्धांजली वाहिली जात आहे.

