(ठाणे)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर या घटनेला घातपाताचे रंग देण्याच्या प्रयत्नांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. “कोणताही अपघात झाला की त्याची नियमांनुसार चौकशी होतेच. या घटनेचीही सखोल चौकशी होणार आहे. मात्र या दुःखद घटनेवर कोणी राजकारण करत असेल, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही ही घटना कोणत्याही प्रकारची घातपाताची नसल्याचे स्पष्ट केले आहे. “पवार कुटुंबाच्या दुःखावर फुंकर घालण्याची ही वेळ आहे. अशावेळी आरोप-प्रत्यारोप आणि अफवांना थारा देऊ नये,” असे आवाहन त्यांनी केले.
‘महाराष्ट्राने एक अनुभवी नेतृत्व गमावले’
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अजित पवार यांनी खासदार, आमदार, मंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. “त्यांच्या जाण्याने आपण एका मोठ्या भावाला, स्पष्टवक्ता आणि दिलदार नेत्याला मुकलो आहोत हे फक्त पवार कुटुंबाचे नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचे अपार नुकसान आहे,” असे त्यांनी सांगितले.
बारामती येथे पवार कुटुंबीयांची भेट घेतल्याचा अनुभव सांगताना शिंदे भावूक झाले. “त्यांची पत्नी, मुले, सुप्रिया सुळे यांच्यासह संपूर्ण कुटुंब अत्यंत दुःखात आहेत. त्या वेदना पाहून मन हेलावून गेले. ईश्वराने या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी,” अशी प्रार्थना त्यांनी केली.
‘ही वेळ राजकारणाची नाही’
“या अपघातात निष्पाप लोकांचे प्राण गेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात असताना या घटनेवरून राजकारण करणे असंस्कृतपणाचे लक्षण आहे,” असे शिंदे म्हणाले. शरद पवार यांनीही स्वतः पुढे येऊन ही घटना घातपाताची नाही, असे स्पष्ट केल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
विकासातील अजित पवारांचे योगदान
अजित पवार हे अत्यंत अनुभवी आणि काम करणारे नेते होते, असे सांगत शिंदे म्हणाले की, वित्तमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या अर्थकारणावर बारकाईने लक्ष ठेवले. विकास प्रकल्प, खर्चाचे नियोजन, जिल्हानिहाय योजना आणि ‘लाडकी बहीण’सारख्या महत्त्वाच्या योजनांमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या जाण्याने सरकारलाही मोठा धक्का बसला आहे.
अपघाताची सखोल चौकशी होणार
विमान अपघातासंदर्भात शिंदे म्हणाले की, तांत्रिक बाबींची चौकशी निश्चित केली जाईल. विमान कंपनी, संबंधित यंत्रणा, तांत्रिक तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांची भूमिका तपासली जाईल. “अपघात का आणि कसा झाला, हे समोर येईल. मात्र चौकशीच्या नावाखाली कट-साजिशीचे आरोप करणे योग्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अंत्यविधीसाठी देशभरातून नेते, नागरिक
शिंदे यांनी सांगितले की, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्र सरकारमधील इतर मंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीसाठी आज (गुरुवारी) उपस्थित राहणार आहेत. “अजित पवार यांची लोकप्रियता केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हजारो-लाखो नागरिक विविध जिल्ह्यांतून येत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
“या अपघातात सहा जणांचे दुर्दैवी निधन झाले आहे. सर्व कुटुंबियांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील. ही अत्यंत संवेदनशील वेळ आहे. राजकीय फायदा न शोधता एकजुटीने पवार कुटुंबाच्या दुःखावर फुंकर घालावी,” असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
दरम्यान आज (गुरुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर अनेक राज्यांचे मुख्यमंत्री विमानाने किंवा हेलिकॉप्टरने बारामतीत येणार आहेत. त्यांच्या सुरक्षित लँडिंगची जबाबदारी आता पूर्णपणे वायुसेनेकडे असणार आहे. स्थानिक प्रशासनाशी समन्वय वायुसेनेचे हे पथक स्थानिक प्रशासन आणि नागरी हवाई उड्डाण विभागाच्या समन्वयाने काम करत आहे. बारामती विमानतळाचा परिसर आता एका लष्करी तळाप्रमाणे सुरक्षित करण्यात आला असून, प्रत्येक हालचालीवर वायुसेनेचे बारीक लक्ष असणार आहे.

