(माणगाव)
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गारळ गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावरील मुगवली फाट्याजवळ मंगळवारी (६ मे) रात्री ८.३० च्या सुमारास एका भरधाव इको गाडीने अँक्टिव्हा दुचाकीला जोरदार धडक दिल्याने १८ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुचाकीवरील चालकासह आणखी एक तरुणी जखमी झाली. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी दुचाकी चालक वैभव सुभाष भोजने (वय २५, रा. देवळी कोंड, ता. माणगाव) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राखाडी रंगाची मारुती इको गाडी (क्रमांक अज्ञात) गोव्याकडून मुंबईकडे अतिवेगात जात होती. मुगवली फाट्याजवळ उजवीकडे वळत असलेल्या अँक्टिव्हा दुचाकीला इको चालकाने मागून जोरदार धडक दिली.
या अपघातात सलोनी संजय भोसले (वय १८, रा. देवळी कोंड) हिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी चालक वैभव सुभाष भोजने आणि जान्हवी संतोष उंडरे (वय १८, रा. देवळी कोंड) हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच माणगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे आणि पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी घटनास्थळी भेट दिली.
या प्रकरणी इको गाडी चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ आणि १३४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

