(बारामती)
राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी पवार कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
बारामती येथे अजित पवार यांच्या पार्थिवावर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजारापू, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, महिला व बाल विकास मंत्री कु. अदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल, अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. परिसरात शोकाकुल वातावरण असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करत सांगितले की, “महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील.”
विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि मान्यवर बारामतीत दाखल होत आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सध्या बारामतीकडे लागले असून, सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, पोलिसांची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे. तसेच अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

