( पुणे / बारामती )
पोलीस भरती आणि बँड पथकात संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार आणि मुंबई पोलीस दलातील बँड पथकातील कॉन्स्टेबल मारुती करे यांच्याविरोधात बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपींनी पोलीस भरती तसेच बँड्समन भरती प्रक्रियेत मदत करण्याचे आणि अधिक गुण मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या माध्यमातून त्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने सुरुवातीला संबंधित यंत्रणांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा करत तिने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही आरोपी पोलीस दलात कार्यरत
या प्रकरणातील आरोपी अमरनाथ कुंभार हे दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलात (SRPF) कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे. तर मारुती करे हे मुंबई पोलीस दलातील बँड पथकात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. पोलीस दलातील व्यक्तींवरच अशा प्रकारचे गंभीर आरोप झाल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे.
गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. आरोपींवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तिने केली आहे. तसेच, आरोपींना लवकर अटक न झाल्यास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा पीडितेने दिला आहे.
पीडितेने सांगितली आपली व्यथा, दोन्ही पोलिसांवर गंभीर आरोप
पीडित महिलेने या प्रकरणाबाबत आपली बाजू मांडताना सांगितले की, “मी 2022 पासून पोलीस भरतीची तयारी करत होते. 2024-25 मध्ये मला बँड्समन पदासाठीही भरती प्रक्रिया होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मी या पदासाठी अर्ज केला. मात्र, या भरती प्रक्रियेबाबत मला फारशी माहिती नव्हती. याच काळात एका मैत्रिणीकडून मला बँड पोलीस कॉन्स्टेबल मारुती करे यांचा संपर्क क्रमांक मिळाला. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर मी त्यांचा क्लास जॉईन केला आणि नियमितपणे प्रशिक्षणासाठी जाऊ लागले,” असे पीडितेने सांगितले.
पीडित महिलेने तक्रारीत नमूद केलेल्या घटनाक्रमाबाबत सांगितले की, “एकेदिवशी क्लास सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार सर तिथे आले. त्यावेळी आमची ओळख झाली. त्यानंतर सुमारे आठ दिवसांनी मारुती करे सरांनी मला सांगितले की, तुम्हाला भेटण्यासाठी कुंभार सर आले आहेत, आपण त्यांना भेटूया. मी त्याला विरोध केला, मात्र भरतीसंदर्भातील दबाव टाकून मला त्यांच्यासोबत जाण्यास सांगण्यात आले,” असा आरोप पीडितेने केला.
फ्लॅटमध्ये नेऊन अत्याचार केल्याचा आरोप
पीडितेने पुढे सांगितले की, “मी त्यांना फ्लॅटच्या खालीच बोलूया असे सांगितले होते. मात्र, इथे लोक पाहत आहेत, लोकं उगाच संशय घेतील, वरती चला असे सांगण्यात आले. त्यानंतर आम्ही तिघे फ्लॅटमध्ये गेलो. काही वेळाने करे सर थंड पेय आणण्याच्या कारणाने बाहेर गेले. त्यानंतर कुंभार सरांनी फ्लॅटचा दरवाजा बंद केला. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घाबरू नको असे सांगून मला पाणी दिले. त्यानंतर मला चक्कर येऊ लागली,” असा दावा तिने केला.
“मला घरी जायचे असल्याचे सांगितले, मात्र त्यानंतर माझ्यावर लैंगिक अत्याचार केला. काही वेळाने करे सर परत आले. त्यानंतर दोघांनीही हा प्रकार कोणाला सांगितल्यास पोलीस भरती होऊ देणार नाही, अशी धमकी दिली,” असा गंभीर आरोप पीडितेने केला आहे.
दरम्यान, आता या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांकडून तक्रारीतील आरोपांची पडताळणी केली जात आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाल्याने तपास यंत्रणांवर निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची जबाबदारी वाढली आहे. या प्रकरणात तपासातून नेमकी कोणती तथ्ये समोर येतात आणि आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

