(रत्नागिरी / वार्ताहर)
पावसाळा संपल्यानंतर जिल्ह्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यूचे एकूण ९२ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये रत्नागिरी शहरातील रुग्णांची संख्या सर्वाधिक असून तब्बल ५२ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. दुसरीकडे, जिल्ह्यात मलेरियाच्या रुग्णांची संख्याही २०० च्या पुढे गेली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून संशयित रुग्णांची तपासणी केली जात आहे.
डेंग्यूच्या रुग्णांचा विचार करता पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यातील ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांतच ८० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळल्याने आता डेंग्यूचा धोका वाढला आहे. रत्नागिरी आणि संगमेश्वर या दोन तालुक्यांमध्ये मिळून ६३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या भागांमध्ये डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाकडे आरोग्य विभागाचे लक्ष केंद्रित झाले आहे.
जिल्ह्यात सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर सर्दी, ताप आणि खोकला यांसारख्या आजारांसह मलेरिया व डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ होऊ लागली. परिणामी, आरोग्य यंत्रणेकडून दररोज हजारो रुग्णांची तपासणी केली जात आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत डेंग्यूच्या संशयावरून एकूण ५५६ रुग्णांचे रक्तनमुने तपासण्यात आले. त्यापैकी ९२ जणांचे अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आले आहेत.
या ९२ रुग्णांपैकी केवळ ७ रुग्ण स्थानिक असल्याचे सांगण्यात आले आहे. उर्वरित सर्व रुग्ण स्थलांतरित नागरिक आणि मजूर असल्याची माहिती देण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि पुणे येथून मोठ्या संख्येने नागरिक जिल्ह्यात आले होते. त्याचबरोबर स्थलांतरित मजुरांचीही उपस्थिती होती. या कारणांमुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसत असले, तरी पावसाळ्याच्या शेवटच्या तीन महिन्यांत झालेली वाढ चिंताजनक मानली जात आहे. विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्येत झालेली वाढ लक्षात घेता नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. ताप किंवा इतर आजारांची लक्षणे जाणवत असताना त्याकडे दुर्लक्ष करू नये अथवा आजार अंगावर काढू नये. कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाऊन तपासणी व उपचार करून घ्यावेत, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.


