(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने होरपळणाऱ्या रत्नागिरीकरांना रविवारी रात्री अवकाळी पावसाने जोरदार दणका दिला. रत्नागिरी शहर आणि परिसराला रविवारी रात्री आठच्या सुमारास मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले. विशेषतः हातखंबा परिसरासह लगतच्या गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह तब्बल दोन तास कोसळलेल्या या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांना तळ्याचे स्वरूप आले होते. या अचानक आलेल्या संकटामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.
पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, विजांच्या थरकाप उडवणाऱ्या कडकडाटासह हातखंबा-पानवल येथील महावितरणच्या मुख्य वीज वाहिनीवर वीज कोसळली. यामुळे झालेल्या जोरदार शॉर्टसर्किटमुळे संपूर्ण परिसर रात्रीच अंधारात बुडाला. महावितरणचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, सोमवारी सकाळपासूनच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम हाती घेतले असून, खराब झालेल्या वीज वाहिन्या बदलण्याचे आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
या अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याऐवजी नागरिकांना केवळ गैरसोयींचाच सामना करावा लागला नाही, तर याचा सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे. सध्या शेतामध्ये ‘महान’ जातीचे भातपीक कापणीच्या आणि काढणीच्या अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, या वादळी पावसामुळे उभे भातपीक आडवे झाले असून, पिकाचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ऐन काढणीच्या हंगामात निसर्गाने घातलेल्या या घालामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त होत असून, बळीराजा चिंतेच्या गर्तेत सापडला आहे.


