(नाशिक / वृत्तसंस्था)
नवरात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या पोलिसांसह भाविकांना वणीकडून येणाऱ्या भरधाव सियाज कारने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. नांदुरी येथील अभोणा वळण रस्त्यावर १८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे आणि वाहतूक पोलीस सचिन राऊत यांच्यासह सात भाविक जखमी झाले. अपघातानंतर कारमधील दोघे जण फरार झाले असून, दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-१२-एमएल-७७४७ क्रमांकाची सियाज कार सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येत होती. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अभोणा वळण रस्त्यावर वाहतूक नियंत्रण आणि वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याच ठिकाणी भरधाव कारने पोलिसांसह दर्शनासाठी आलेल्या भाविकांना जोरदार धडक दिली. या धडकेत अनेक जण गंभीर जखमी झाले.
अपघातात पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे आणि वाहतूक पोलीस सचिन राऊत जखमी झाले. त्यापैकी विजय गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत कपिल साळी, मोरेश्वर पाटील, गोपाळ सोनवणे, दुर्गेश चौधरी, सोहम पवार, राजाराम जाधव आणि राधाबाई गावित हे सात भाविकही जखमी झाले आहेत.
अपघातानंतर जखमींना तातडीने वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी भाविकांपैकी काहींना पुढील उपचारांसाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे. नवरात्रोत्सवात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त कारमध्ये चार जण असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी दोन जण घटनास्थळावरून फरार झाले, तर दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या महिला अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवठाण येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित कारने अपघातापूर्वी अन्य वाहनांनाही धडक दिल्याची माहिती असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण आणि फरार व्यक्तींचा शोध याबाबतची पुढील माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.


