(गणपतीपुळे / वैभव पवार)
बौद्ध कलावंतांना आंबेडकरी जलसा कलेतील गायन पद्धती आणि वाद्यवादनाचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील धम्मक्रांती कला मंचाच्या वतीने शनिवार, दिनांक १४ नोव्हेंबर रोजी जाकादेवी येथे हार्मोनियम व ढोलकी वादन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
जाकादेवी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ही कार्यशाळा पार पडणार आहे. रत्नागिरी तालुका तसेच जिल्ह्यातील कार्यरत बौद्ध कलावंतांसाठी ही कार्यशाळा विनामूल्य खुली ठेवण्यात आली आहे. आंबेडकरी जलसा कलेतील गायन पद्धतीनुसार हार्मोनियम आणि ढोलकी वादनाचे प्रशिक्षण या उपक्रमातून दिले जाणार आहे.
नवोदित तसेच सध्या कार्यरत असलेल्या कलावंतांना तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून योग्य पद्धतीने प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे वादनकलेची आवड असलेल्या कलावंतांना आपले कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे.
धम्मक्रांती कला मंच ही संघटना विविध सामाजिक, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. या कार्यशाळेची माहिती बौद्ध समाजातील बंधू-भगिनींनी आपल्या वाडी-वस्तीतील नवोदित आणि कार्यरत कलावंतांपर्यंत पोहोचवावी तसेच त्यांना कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन धम्मक्रांती कला मंचाचे अध्यक्ष रविकांत पवार आणि सहकाऱ्यांनी केले आहे.


