(मुंबई)
७२व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. पुणे ग्रामीणच्या रेखा सावंत हिच्याकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, मुंबई उपनगर पश्चिमच्या कोमल देवकर हिची उपकर्णधार पदाची पदी निवड करण्यात आली आहे. हा संघ २६ जानेवारी रोजी पहाटे तपोवन एक्स्प्रेसने तेलंगणाकडे रवाना झाला असून, राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राच्या कामगिरीकडे आता क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
ही संघनिवड महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे प्रभारी अध्यक्ष गजानन कीर्तीकर यांच्या मान्यतेने आणि मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे हे निवडणूक प्रक्रियेत व्यस्त असल्याने कीर्तीकर यांनी स्वतः या प्रक्रियेत लक्ष घातले होते.
७२वी महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा तेलंगणा राज्यातील गच्ची बोवली येथील बंदिस्त क्रीडा संकुलात २७ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे सराव शिबिर मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आणि स्वस्तिक क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली पूर्व येथील सुवर्णा संतोष केणे गार्डन, आयरे रोड येथे सुरू आहे. या शिबिराचे मार्गदर्शन प्रशिक्षिका मेघाली म्हसकर (कोरगावकर) करत आहेत.
संघासोबत फिजिओथेरपिस्ट म्हणून सलोनी संकपाळ, तर फिटनेस ट्रेनर म्हणून सायली नागवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पारदर्शकतेसाठी या संघनिवडीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. मीनल पालांडे, वीणा शेलटकर आणि मेघाली कोरगावकर यांच्या निवड समितीने हा संघ निश्चित केला असून, या तिन्ही सदस्य शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आहेत.
महाराष्ट्र महिला कबड्डी संघात रेखा सावंत (पुणे ग्रामीण), कोमल देवकर (मुंबई उपनगर पश्चिम), प्रतीक्षा तांडेल (मुंबई शहर पश्चिम), समृद्धी मोहिते (मुंबई उपनगर पूर्व), पौर्णिमा जेधे (मुंबई शहर पूर्व), ज्युली मिस्किटा (पालघर), साक्षी सावंत (मुंबई शहर पूर्व), समरिन बुरोंडकर (रत्नागिरी), गार्गी साखरे (सातारा), आम्रपाली गलांडे (पुणे शहर), निकिता पडवळ (पुणे ग्रामीण), याशिका पुजारी (मुंबई उपनगर पूर्व), माधुरी गवंडी (ठाणे शहर) आणि संजना भोईर (पालघर) यांचा समावेश आहे. राखीव खेळाडू म्हणून हर्षा शेट्टी (पुणे शहर), तसलिन बुरोंडकर (रत्नागिरी) आणि अंकिता चव्हाण (पुणे शहर) यांची निवड करण्यात आली आहे.

