(मुंबई)
प्रसिद्ध मराठी कंटेंट क्रिएटर प्रथमेश कदम यांचे २६ जानेवारी २०२६ रोजी वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी निधन झाले. आईसोबत विनोदी आणि भावनिक व्हिडिओ तयार करून लाखो प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या प्रथमेशच्या अचानक जाण्याने सोशल मीडियावर शोककळा पसरली आहे.
आई-मुलाची सुपरहिट जोडी हरपली
प्रथमेश कदम केवळ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नव्हता, तर आईशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे तो घराघरात पोहोचला होता. आईसोबतचे त्याचे साधे, विनोदी आणि भावस्पर्शी रील्स मराठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. गेल्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यानंतर, प्रथमेशने कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आईची विशेष काळजी घेतली होती. हेच नाते त्याच्या कंटेंटमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होते.
सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग
प्रथमेशच्या इंस्टाग्रामवर १ लाख ८६ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते, तर युट्यूबवरही त्याचे मोठे कुटुंब होते. त्याचा साधेपणा, मराठमोळी शैली आणि भारतीय कुटुंबातील नात्यांवर आधारित कंटेंट यामुळे तो कमी वेळातच क्रिएटर इकोसिस्टममधील चमकता तारा ठरला होता.
दीर्घ आजारानंतर अखेरची झुंज अपयशी
२६ जानेवारी २०२६ रोजी प्रथमेश कदम यांचे निधन झाले. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
दरम्यान, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तन्मय पाटेकर यांनी इंस्टाग्राम स्टोरीद्वारे प्रथमेशच्या निधनाचं कारण स्पष्ट केलं आहे.
तन्मय यांनी लिहिलं आहे की, “प्रथमेश टायफॉइड आणि रक्तातील कावीळ या दीर्घ आजाराने त्रस्त होता. अनेक उपचार करूनही डॉक्टरांना यश आलं नाही. कृपया चुकीच्या अफवा पसरवून त्याच्या कुटुंबाला मानसिक त्रास देऊ नका.”
तन्मय पुढे म्हणाले, “आज त्याची आई आणि बहीण कुणालाही उत्तर देण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांचं दु:ख समजून घेणं आणि त्यात सहभागी होणं हेच आपलं कर्तव्य आहे.”
प्रथमेश आणि त्याच्या आईची जोडी सोशल मीडियावर सुपरहिट होती. त्यांचे व्हिडिओ आजही चाहत्यांच्या आठवणीत जिवंत आहेत. तरुण वयातच एका लोकप्रिय मराठी कंटेंट क्रिएटरचा असा अचानक अंत झाल्याने संपूर्ण सोशल मीडिया विश्व हळहळ व्यक्त करत आहे.

