(जळगाव)
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावातून एका धक्कादायक आणि संतापजनक घटनेची बातमी समोर आली आहे. नेहमीप्रमाणे शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना रोहन चौधरी नावाच्या तरुणाने शेताजवळील विहिरीत ढकलले. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही मुली इयत्ता ९ वीच्या वर्गात शिकत होत्या. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्या घरातून शिकवणीसाठी निघाल्या होत्या. या यावेळी गावाजवळील शेतात दबा धरून बसलेल्या संशयिताने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. काही क्षणातच त्याने मुलींना विहिरीत नेऊन ढकलले आणि पळ काढला.
मुलींनी ओरडल्याने शेजारी शेतकरी आणि ग्रामस्थ घटनास्थळी धाव घेऊन आले. विहिरीला पाणी असल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होता, परंतु ग्रामस्थांनी तातडीने बचावकार्य सुरू करून मुलींना सुरक्षित बाहेर काढले.
घटनेनंतर भुसावळ पोलिसांनी तत्परतेने रोहन चौधरी याला ताब्यात घेतले. आरोपीने हे विकृत पाऊल का उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना संपूर्ण जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली असून, मुलींसाठी विशेष सुरक्षा उपाय वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.

