(दिल्ली/ वृत्तसंस्था)
भारतीय हॉकीसाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. एएचएफ ज्युनियर आशिया कप २०२६ स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी विजेतेपद पटकावत भारताचे नाव आशियाई हॉकीत पुन्हा एकदा उंचावले. चीनमधील मोकी येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यांत दोन्ही भारतीय संघांनी प्रभावी कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. भारतीय जूनियर महिला हॉकी संघाने अंतिम लढतीत यजमान चीनचा १-० असा पराभव करत सलग तिसऱ्यांदा एशिया कपचे विजेतेपद मिळवले.
विशेष आणि अत्यंत अभिमानास्पद बाब म्हणजे, ज्युनियर महिला संघाच्या अंतिम सामन्यात न्यू इंग्लिश स्कूल, नूल कोल्हापूरची विद्यार्थिनी ‘सानिका चंद्रकांत माने’ हिने निर्णायक गोल करुन भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. कोल्हापूरकरांसाठी हा ऐतिहासिक सुवर्णक्षण होता. सानिकाने मैदानात दाखवलेली जिद्द आणि अचूक कामगिरी वाखाणण्यासारखी होती. या उत्कृष्ट कामगिरीमुळे सानिकाला अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले.
भारताच्या विजयात सानिका चंद्रकांत माने हिच्या गोलची निर्णायक भूमिका ठरली. तिने सामन्याच्या १७व्या मिनिटाला भारतासाठी महत्त्वपूर्ण गोल नोंदवला. त्यानंतर भारतीय बचावफळीने भक्कम कामगिरी करत चीनला गोल करण्याची कोणतीही संधी दिली नाही.
या विजयानंतर भारतीय महिला संघाने २०२३ आणि २०२४ नंतर पुन्हा एकदा महिला जूनियर एशिया कपवर कब्जा केला. या विजेतेपदासोबतच भारतीय महिला संघाने आगामी जूनियर विश्वचषकासाठी आपली पात्रता निश्चित केली आहे.
महिला संघाच्या विजयानंतर भारतीय जूनियर पुरुष हॉकी संघानेही आपला दबदबा कायम ठेवला. मोकी ट्रेनिंग बेस येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव करत विजेतेपद पटकावले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने आक्रमक खेळ करत सामन्यावर नियंत्रण मिळवले आणि अखेर दमदार विजयाची नोंद केली.
या विजयानंतर भारतीय पुरुष संघाने जूनियर पुरुष एशिया कपचे सलग चौथे विजेतेपद मिळवले. हे भारताचे या स्पर्धेतील विक्रमी सहावे विजेतेपद ठरले. पुरुष संघानेही आगामी एफआयएच जूनियर विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे.
महिला आणि पुरुष या दोन्ही भारतीय जूनियर संघांनी एकाच दिवशी एशिया कपचे विजेतेपद मिळवणे ही भारतीय हॉकीसाठी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कामगिरी ठरली. महिला संघाची सलग तिसरी विजेतेपदाची कामगिरी आणि पुरुष संघाचे सलग चौथे विजेतेपद यामुळे भारतीय हॉकीच्या युवा पिढीने आशियाई स्तरावरील आपले वर्चस्व पुन्हा अधोरेखित केले आहे.


