आयपीएल २०२५ चा ४५ वा लीग सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात, एमआयने एलएसजीचा ५४ धावांनी पराभव केला. या सामन्या प्रथम फलंजदाजी करताना सात गडी गमावून २१५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनौ संघ २० षटकांत १६१ धावांवर सर्वबाद झाला. या विजयसह मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. आयपीएल २०२५ मध्ये खराब सुरुवातीनंतर जोरदार पुनरागमन करत हार्दिक पंड्याच्या संघाने सलग पाचवा विजय मिळवला आहे. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, मुंबईने लखनौचा ५४ धावांनी पराभव केला. यासह मागील पराभवाचा बदलाही घेतला.
विजयासाठी २१६ धावांचं आव्हान तसं कठीणच होतं. आणि जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) अचूकता आणि विल जॅक्सची फिरकी यांनी आव्हान आणखी कठीण केलं. बुमराहच्या पहिल्या षटकात त्याने पहिले ३ चेंडू निर्धाव दिले. जम बसलेल्या एडन मार्करमचाही संयम सुटला. आणि चौथा चेंडू त्याने टोलवण्याचा प्रयत्न केला. त्या नादात ९ धावांवर तो बाद झाला. विल जॅक्सने एकाच षटकांत धोकादायक निकोलस पूरन (२७) आणि ऋषभ पंत (४) यांना बाद केलं. दोघांचीही फटक्याची निवड चुकली. यामुळे लखनौवर दडपण कायम राहिलं. आयुष बदोनी (Ayush Badoni) आणि डेव्हिड मिलर (David Miller) यांनी पाचव्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी करत खेळातील रंगत जरुर वाढवली. पण, ट्रेंट बोल्टच्या (Trent Boult) एका उसळलेल्या चेंडूवर आयुष बदोनी ३५ धावांवर बाद झाला. आणि मुंबईसाठी विजय जवळ आला. बुमराहने डेव्हिड मिलरलाही २१ धावांवर बाद केलं. आणि पुढे लखनौच्या आव्हानातील हवाच गेली. मुंबईच्या सर्वच गोलंदाजांनी जबाबदारीने गोलंदाजी केली. बुमराहने तर ४ षटकांत २२ धावा देत ४ बळी मिळवले. बोल्टने ३. विल जॅक्सने २ आणि मुंबईकडून आयपीएल पदार्पण करणाऱ्या कॉर्बिन बॉशने १ बळी मिळवला.
मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये केला खास पराक्रम –
मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासात सर्वाधिक १५० विजय मिळवणारा विजय ठरला आहे. मुंबईचा लखनौविरुद्धचा विजय हा १५० वा होता. असा पराक्रम करणारा मुंबई हा पहिला संघ ठरला आहे. पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई संघाने हा पराक्रम २७१ सामन्यात केला आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. आयपीएलमध्ये सीएसकेने २४८ पैकी १४० सामने जिंकले आहेत. सीएसकेने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपदही जिंकले आहे.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स संघ आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने आतापर्यंत १३४ सामने जिंकले आहेत. गतविजेत्या केकेआरने २६१ सामने खेळले आहेत. केकेआरने एकूण तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चौथ्या स्थानावर आहे. आरसीबीने २६६ पैकी १२९ सामने जिंकले आहेत. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स (DC) पाचव्या स्थानावर आहे. डीसीने आयपीएलमध्ये २६१ पैकी १२१ सामने जिंकले आहेत.

