(चिपळूण)
राज्यभरात मोठी खळबळ उडविणाऱ्या TWJ (टीडब्ल्यूजे) कंपनीच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणात चिपळूण पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी दीर्घकाळ फरार असलेला TWJ कंपनीचा संचालक संकेश घाग याला चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे. अनेक दिवसांच्या शोध मोहिमेनंतर ही महत्त्वाची कारवाई करण्यात आली.
TWJ कंपनीने अल्प कालावधीत दामदुप्पट परतावा, मासिक निश्चित उत्पन्न आणि सुरक्षित गुंतवणूक अशा आकर्षक आश्वासनांच्या माध्यमातून राज्यातील हजारो गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर भांडवल उभे केले होते. सुरुवातीच्या टप्प्यात काही गुंतवणूकदारांना परतावा देण्यात आल्याने कंपनीवरील विश्वास वाढला. मात्र, काही महिन्यांपूर्वी अचानक परतावा थांबवण्यात आला, त्यानंतर कंपनीची कार्यालये बंद झाली आणि संचालक मंडळ संपर्काबाहेर गेले.
या प्रकारानंतर फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांनी विविध पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल केल्या होत्या. चिपळूण पोलीस ठाण्यातही TWJ कंपनीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तपासादरम्यान संकेश घाग फरार झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. अखेर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
अटकेनंतर संकेश घागला चिपळूण न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलीस ठाणे आणि न्यायालय परिसरात फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेक गुंतवणूकदारांनी आपल्या आयुष्याची जमापूंजी TWJ कंपनीत गुंतवली असून, पैसे परत मिळतील का याबाबत त्यांची चिंता कायम आहे.
या अटकेमुळे TWJ कंपनीचा मुख्य सूत्रधार व व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर याच्या शोधाला वेग येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच कंपनीकडून जमा झालेल्या रकमेचा मागोवा, बँक व्यवहार, मालमत्ता खरेदी-विक्री आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची भूमिका तपासात उघड होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यापूर्वीही गुंतवणूकदारांनी फसवणूक झाल्याचा आरोप करत मोर्चे, आंदोलन आणि उपोषणाचे इशारे दिले होते. संकेश घागच्या अटकेमुळे गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी दोषींवर कठोर कारवाई करावी आणि फसवणूक केलेली रक्कम जप्त करून ती गुंतवणूकदारांना परत मिळावी, अशी ठाम मागणी होत आहे.
आता न्यायालय संकेश घागला किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावते, तपासात कोणती नवी माहिती समोर येते आणि मुख्य सूत्रधार कधी अटकेत येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

