(गणपतीपुळे / वैभव पवार)
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळेला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि नामवंत क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनी आज (मंगळवार, ता. २७ रोजी) भेट दिली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांसह स्वयंभू श्री गणपतीचे मनोभावे दर्शन घेतले.
या प्रसंगी संस्थान श्री देव गणपतीपुळे पंच कमिटीच्या वतीने अजिंक्य रहाणे यांचे यथोचित सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या देवस्थानचे पंच, पुजारी व कर्मचारी यांच्याशी रहाणे यांनी आपुलकीने संवाद साधला.
अजिंक्य रहाणे यांच्या उपस्थितीमुळे गणपतीपुळे मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक भाविक व पर्यटकांनी त्यांच्यासोबत छायाचित्रे काढून भेटीचा आनंद घेतला.
या भेटीदरम्यान अजिंक्य रहाणे यांनी गणपतीपुळे देवस्थानच्या सामाजिक उपक्रमांचे तसेच भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांचे विशेष कौतुक केले. तसेच गणपतीपुळे येथील निसर्गरम्य पर्यटनस्थळाचा अनुभव अतिशय आनंददायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

