(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील पदपथ नागरिकांना सुरक्षितपणे चालण्यासाठी, तर रस्ते वाहतुकीसाठी आहेत. त्यामुळे पदपथांसह सार्वजनिक ठिकाणी झालेली सर्व प्रकारची अतिक्रमणे हटविण्याची मोहीम अधिक व्यापक करण्यात येणार असून, कारवाई करताना कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी मांडली. अतिक्रमण करणाऱ्यांवर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी नगर परिषद प्रशासनाला दिल्या.
रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (२५ ऑगस्ट) नूतन इमारतीतील सभागृहात पार पडली. या सभेत शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न केंद्रस्थानी राहिला. नगर परिषदेने शहरातील टपऱ्या आणि अनधिकृत दुकाने हटविण्याची मोहीम यापूर्वीच सुरू केली आहे. या कारवाईवरून शहरात उमटलेल्या विविध प्रतिक्रियांचे पडसाद सर्वसाधारण सभेतही उमटले. अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत नगरसेवकांमध्ये विविध मतप्रवाह पाहायला मिळाले. काही सदस्यांनी ठराविक भागांमध्येच कारवाई होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत संपूर्ण शहरातील सर्व प्रकारची अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली. यावर नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. शहरातील अतिक्रमणांविरोधात कारवाई करताना कोणताही भेदभाव केला जाणार नसून, सर्वांसाठी नियम समान असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. पदपथ आणि सार्वजनिक जागा नागरिकांच्या वापरासाठी मोकळ्या ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सभेत अतिक्रमणाच्या प्रश्नाबरोबरच शहराच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. नागरी बेघर निवाऱ्याच्या देखभालीसाठी निधी मिळविणे, झोपडपट्टीधारकांचे सर्वेक्षण करून पुनर्वसनासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणे, तसेच नगर परिषदेच्या विविध विभागांतील कामांना मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली. शहरातील विविध विकासकामांच्या अंदाजपत्रकांनाही मंजुरी देण्यात आली असून, नवीन विकासकामांसाठी निविदा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला.
गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे निर्देश
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांच्या स्थितीचा मुद्दाही सभेत चर्चिला गेला. महानगर गॅस कंपनीकडून शहरात सुरू असलेल्या खोदकामांचा आढावा घेत, तूर्तास शहरात कोणतेही नवीन खोदकाम करू नये, अशा स्पष्ट सूचना नगराध्यक्षा सुर्वे यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या. यापूर्वी करण्यात आलेल्या खोदकामांमुळे निर्माण झालेले खड्डे तातडीने बुजवावेत, तसेच विविध ठिकाणी साचलेले मातीचे ढिगारे तत्काळ हटवून रस्त्यांची स्वच्छता करावी, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील वाहतूक आणि नागरिकांची वर्दळ वाढणार असल्याने अतिक्रमणमुक्त पदपथ, सुस्थितीतील रस्ते आणि स्वच्छ सार्वजनिक परिसर याकडे नगर परिषद प्रशासनाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

