(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या ‘बाल वाचन कट्टा’ या अभिनव उपक्रमाला पहिल्याच दिवसापासून बालवाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. १० मे २०२६ पासून सुरू झालेला हा उपक्रम १० जून २०२६ पर्यंत विनामूल्य सुरू राहणार असून, रत्नागिरीतील बालवर्गासाठी तो ज्ञान आणि मनोरंजनाची अनोखी पर्वणी ठरत आहे.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, टीव्ही आणि इंटरनेटच्या वाढत्या प्रभावामुळे मुलांचा वाचनाकडे असलेला कल कमी होत चालला आहे. हीच बाब लक्षात घेऊन मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांची कल्पनाशक्ती आणि बौद्धिक क्षमता वाढावी या उद्देशाने वाचनालयाने ‘बाल वाचन कट्टा’ सुरू केला आहे.
या उपक्रमांतर्गत मुलांसाठी विविध प्रकारचे दर्जेदार आणि आकर्षक वाचनसाहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामध्ये ‘हॅरी पॉटर’, ‘फास्टर फेणे’, ‘फेमस फाईव्ह’ यांसारख्या लोकप्रिय पुस्तक मालिकांचा समावेश आहे. तसेच थोर व्यक्तिमत्त्वे, समाजसुधारक यांची ओळख करून देणारी पुस्तके, चातुर्यकथा, युद्धकथा, साहसकथा यांचाही समावेश करण्यात आला आहे.
विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाविषयी मुलांमध्ये कुतूहल निर्माण व्हावे यासाठी ‘१६९५ स्मार्ट रोबो-ए आय’ आणि ‘औरंगजेब’ यांसारखी विज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयांवरील पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या उपक्रमाला पालकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, अनेक पालक आपल्या पाल्यांना मोबाईलपासून दूर ठेवत ग्रंथालयाच्या शांत वातावरणात मुक्त वाचनासाठी प्राधान्य देताना दिसत आहेत. सदर उपक्रम १० जूनपर्यंत विनामूल्य सुरू राहणार असून, जास्तीत जास्त मुलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

