(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार प्रजासत्ताक दिन 2026 च्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील सहा बेटांवर रत्नागिरी पोलीस दलामार्फत यशस्वीपणे ध्वजारोहण करण्यात आले. या उपक्रमातून सागरी सीमांचे संरक्षण, राष्ट्रीय सार्वभौमत्व व अखंडतेचा ठाम संदेश देण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी DGP–IGP परिषद 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यातील निर्जन (Uninhabited) बेटांवर दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी ध्वजारोहण करून त्या ठिकाणी रात्र वास्तव्य करण्याबाबत निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलाने जिल्ह्यातील सागरी हद्दीतील बेटांवर हा विशेष उपक्रम राबविला. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 15 बेटे असून त्यापैकी दोन बेटांवर मनुष्यवस्ती आहे, तर 13 बेटे निर्मनुष्य आहेत. यापैकी सहा बेटांवर 26 जानेवारी 2026 रोजी ध्वजारोहण करण्यात आले. त्यामध्ये दापोली तालुक्यातील सुवर्णदुर्ग किल्ला (हणें), खेड तालुक्यातील बाबा मलंग दर्गा बेट, चिपळूण तालुक्यातील जुवाड पेठ बेट (गोवळकोट), संगमेश्वर तालुक्यातील जुव्याचे पेंद (कुरधुंडा) तसेच नाटे परिसरातील जुवे बेट (बुरंबेवाड) आणि वाकडवन (कोंडसर) या बेटांचा समावेश आहे.
दापोली पोलीस ठाणे हद्दीतील सुवर्णदुर्ग किल्ला (बेट) येथे पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे, पोलीस निरीक्षक श्री. महेश तोरस्कर, दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अश्वनाथ खेडकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. हेमराज निर्मळ, श्री. राजकुमार यादव यांच्यासह मत्स्य व बंदर विभागाचे कर्मचारी, पोलीस पाटील, माजी सैनिक, एनसीसीचे विद्यार्थी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.
या उपक्रमातून निर्जन बेटांवरही पोलीस सुरक्षा यंत्रणांची प्रभावी उपस्थिती, सागरी सीमांचे संरक्षण तसेच राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून तिरंग्याचा सन्मान अधोरेखित करण्यात आला. रत्नागिरी पोलीस दल सागरी सुरक्षेसाठी सदैव सज्ज असून भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रहित जपण्याची कटिबद्धता यावेळी व्यक्त करण्यात आली.

