(संगमेश्वर / एजाज पटेल)
माघ शुद्ध सप्तमी निमित्ताने ३४५ वा श्रीशंभूराजाभिषेक उत्सव कसबा येथे भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. भिडे गुरुजी यांच्या श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, कसबा स्मारक नित्यपूजन समिती तसेच ग्रामस्थांच्या वतीने रविवार, २५ जानेवारी रोजी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी लांजा येथील जंगम गुरुजी यांच्या उपस्थितीत पवित्र सप्तनद्या, नवग्रह तसेच पंचायतन–शिवशक्ती यांचे आवाहन करून विधीवत श्रीशंभूराजाभिषेक करण्यात आला. पारंपरिक विधी आणि मंत्रोच्चारांमुळे परिसर भक्तिमय झाला.
अभिषेकानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीने संपूर्ण कसबानगरी दुमदुमून गेली आणि भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
या कार्यक्रमात कसबा ग्रामस्थांसह संगमेश्वर, रत्नागिरी आणि लांजा तालुक्यातील अनेक धारकरी उपस्थित होते. हा उत्सव केवळ आनंदाचा सोहळा नसून संगमेश्वर परिसरात श्रीशिवाजी महाराज व श्रीसंभाजी महाराजांच्या शुद्ध विचारांची बीज पेरणारा आणि कसबा येथील धर्मवीर स्मारकात गेल्या दोन वर्षांपासून नियमित सुरू असलेल्या नित्यपूजन अधिष्ठानाचा संदेश घराघरात पोहोचवणारा उपक्रम असल्याची भावना प्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी व्यक्त केली.

