(रत्नागिरी)
जयगड बंदर येथे उभारण्यात आलेल्या प्लांट क्वारंटाईन कार्यालय आणि एनएबीएल मान्यताप्राप्त एफ.एस.एस.ए.आय (FSSAI) लॅबमुळे कोकणातील शेतकरी, मच्छीमार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार असून प्रदेशाच्या आर्थिक विकासाला नवे दालन खुले होईल,असे प्रतिपादन महाराष्ट्र सागरी मंडळाचे संचालक परशुराम पाटील यांनी केले.
महाराष्ट्र सागरी मंडळ, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) आणि काजू बोर्ड यांच्या संयुक्त प्रयत्नांतून जेएसडब्ल्यू जयगड बंदर येथे उभारण्यात आलेल्या प्लांट क्वारंटाईन कार्यालय आणि एनएबीएल मान्यताप्राप्त एफ.एस.एस.ए.आय (FSSAI) लॅबचे उद्घाटन महाराष्ट्र सागरी मंडळाचे संचालक श्री. पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. या सुविधा उभारण्यासाठी श्री. पाटील यांनी गेल्या वर्षभर संबंधित केंद्रीय व राज्य शासनाच्या विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
याप्रसंगी महाराष्ट्र सागरी मंडळाचे कॅप्टन संजय उगलमुगले, प्लांट क्वारंटाईन अधिकारी सुनील पाटील, डॉ. स्वामी, एनएबीएल लॅब प्रतिनिधी श्री. गांधी, मिथीलेश देसाई तसेच शेतकरी बांधव, निर्यातदारांचे प्रतिनिधी आणि जयगड पोर्टचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन प्लांट क्वारंटाईन व एफ.एस.एस.ए.आय लॅब सुरू झाल्यामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, मच्छीमार तसेच काजू व आंबा निर्यातदारांना स्थानिक स्तरावर तपासणी व प्रमाणन सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अतिरिक्त वेळ, इंधन व वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. जयगड बंदर भौगोलिक स्थान, सर्व हंगामात कार्यरत खोल पाण्याची क्षमता, विद्यमान वेअरहाऊस व कोल्ड स्टोरेज सुविधा आणि कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर व उत्तर कर्नाटक या मागील प्रदेशाशी असलेला संपर्क यामुळे ते कृषी-निर्यातीचे महत्त्वाचे केंद्र बनण्याची क्षमता आहे.
अभ्यास अहवालानुसार या माध्यमातून निर्यात लॉजिस्टिक खर्च 10 ते 15 टक्क्यांनी कमी होऊन कोकणातील कृषी उत्पादनांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धात्मकता वाढणार आहे. कोकणातील हापूस आंबा, काजू, फणस, नारळ, कोकम, मसाले तसेच मत्स्य उत्पादनांसाठी जागतिक स्तरावर ओळखला जातो. मात्र निर्यात प्रामुख्याने मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) सुमारे 350 कि.मी. अंतरावर अवलंबून असल्याने प्रति कंटेनर सुमारे रुपये साठ हजार पर्यंत वाहतूक खर्च तसेच किमान दोन दिवस अतिरिक्त वेळ, त्यामुळे ताजेपणावर परिणाम होतो व हंगामात मोठी गर्दी व जोखीम अशा अडचणी निर्माण होत होत्या.
या उपक्रमास मोलाचे मार्गदर्शन व सातत्यपूर्ण पाठबळ दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे तसेच मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव श्रीकर परदेशी आणि मित्रा या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांचे श्री. पाटील यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

