(रत्नागिरी /प्रतिनिधी)
प्रजासत्ताक दिन 2026 च्या औचित्याने रत्नागिरी पोलीस दलामार्फत उत्तर-पूर्व भारतातील विद्यार्थ्यांसाठी ‘विशेष संपर्क’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली व नागरिक-केंद्रित पोलीसिंगच्या संकल्पनेनुसार हा उपक्रम राबविण्यात आला.
नागालँड व मणीपूर या राज्यांमधून शिक्षणासाठी रत्नागिरी जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना आपुलकीची भावना देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यानिमित्ताने 26 जानेवारी रोजी पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर झालेल्या ध्वजारोहण समारंभासाठी उत्तर-पूर्व भारतातील विद्यार्थ्यांना विशेष आमंत्रण देण्यात आले होते. या अनुषंगाने चिपळूण तालुक्यात वास्तव्यास असून शिक्षण घेणाऱ्या उत्तर-पूर्व भारतातील एकूण 19 विद्यार्थ्यांशी पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी थेट संवाद साधला. या ‘विशेष संपर्क’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या अडचणी, अनुभव आणि अपेक्षा जाणून घेत त्यांना पोलीस विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम, मिशन, प्रकल्प तसेच डिजिटल अॅप्लिकेशनची सविस्तर माहिती देण्यात आली.
या संवादातून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी निर्धास्तपणे पोलीस यंत्रणेशी संपर्क साधता येईल, असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाल्याचेही जाणवले. विविध भाषा, संस्कृती आणि प्रांत असूनही ‘आपण सर्व भारतीय आहोत’ हा एकतेचा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे अधोरेखित झाला. रत्नागिरी पोलीस दल भविष्यातही अशा लोकाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून सर्व घटकांशी संवाद वाढविण्यास कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

