(तरवळ / अमित जाधव)
७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज, मालगुंड यांच्या वतीने भव्य आणि देखणी शोभायात्रा काढण्यात आली. मालगुंड ग्रामपंचायत ते प्रशाला असा मार्ग असलेली ही शोभायात्रा उत्साह, शिस्त आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्याध्यापक बिपीन परकर व पर्यवेक्षक उमेश केळकर यांच्या संकल्पनेतून, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने ही शोभायात्रा साकारण्यात आली. यंदाच्या शोभायात्रेची संकल्पना ‘विविधतेतून एकतेचा जल्लोष’ अशी होती. विविध वेशभूषेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’, ‘चक दे इंडिया’ यांसारख्या देशभक्तीपर गीतांच्या तालावर थिरकत सहभागी झाले होते.
मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनिल ऊर्फ बंधू मयेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण व भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रशालेतील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या शिस्तबद्ध संचलनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यानंतर विद्यार्थी ग्रामपंचायत येथे ध्वजारोहणासाठी गेले आणि तेथून शोभायात्रेला प्रारंभ झाला.
विविध वेशभूषांमधून भारताची सांस्कृतिक ओळख
शोभायात्रेत कोळी, आदिवासी, धनगर, वारकरी, शेतकरी, गुजराती, बंगाली, दक्षिण भारतीय अशा विविध समाजांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वेशभूषा, तसेच लेझीम पथक व साहित्य कवायत सादर करणारे विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्वांनी एकत्रितपणे विविधतेतून एकतेचा संदेश प्रभावीपणे दिला.
राजमाता जिजाऊ आणि शिवरायांचा जिवंत देखावा ठरला भावस्पर्शी
शोभायात्रेतील जिवंत देखावे विशेष आकर्षण ठरले. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ या बाल शिवबाला स्वराज्याचे धडे देताना दाखवलेला देखावा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून गेला. यासोबतच स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या कैदेनंतर झालेल्या हालअपेष्टांचे चित्रण करणारा देखावा तसेच ‘कांतारा’ चित्रपटातील वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे सादरीकरणही विशेष लक्षवेधी ठरले.
सुमारे दोन ते अडीच तास चाललेल्या या शोभायात्रेने संपूर्ण मालगुंड परिसर भारावून टाकला. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले ग्रामस्थ, पालक आणि पर्यटक थांबून हा देखणा सोहळा पाहत होते आणि विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करत होते.
या कार्यक्रमाला मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनिल ऊर्फ बंधू मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत, खजिनदार संदीप कदम, सहसचिव श्रीकांत मेहेंदळे, निमंत्रित संचालक विलास राणे, सल्लागार मंडळ सदस्य नंदकुमार डिंगणकर यांच्यासह मोठ्या संख्येने पालक, ग्रामस्थ, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

