(रत्नागिरी -संगमेश्वर /प्रतिनिधी)
ऑनलाईन मॅट्रिमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून विवाहासाठी परिचय करून देण्याच्या आड संगमेश्वरातील एका तरुणाची तब्बल ₹६ लाख ६२ हजार ६१० रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ठाण्यातील प्रियंका विनोद लोणारे हिचा शोध सुरू आहे.
कळंबस्ते (ता. संगमेश्वर) येथील नितीन प्रकाश बांबाडे (वय ३२) यांनी विवाहासाठी ‘मान्यवर मॅट्रिमोनियल’ या अमरावती/नागपूर येथील ऑनलाइन विवाह संस्थेच्या वेबसाइटवर आपला बायोडाटा अपलोड केला होता. त्यानंतर संस्थेकडून त्यांना प्रियंका लोणारे हिचा बायोडाटा मिळाला. बायोडाटा पसंत पडताच नितीन आणि प्रियंका यांच्यात फोनवरून संवाद सुरू झाला. बोलण्यातून जवळीक वाढल्यावर प्रियंकाने नितीनला लग्नाचे आश्वासन दिले. मात्र, त्याच आडून तिने वेळोवेळी विविध कारणांसाठी पैसे मागण्यास सुरुवात केली. किरकोळ खर्च, अपेंडिक्सचे ऑपरेशन, एम्ब्रॉयडरी मशीन खरेदी अशा अनेक कारणांचा हवाला देत नितीनकडून पैसे उकळण्यात आले.
विश्वास ठेवून नितीनने जी-पे द्वारे ₹३,१३,६१० आणि फोन-पे द्वारे ₹३,४९,००० रुपये पाठवले. मात्र एवढी रक्कम मिळूनही प्रियंकाने न पैसे परत केले, ना लग्नाचा विषय पुढे नेला. उलट पैसे परत मागितले असता ती टाळाटाळ करू लागली.
या प्रकाराची कल्पना येताच नितीन बांबाडे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. ६ मार्च २०२५ ते २६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत फसवणूक घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. सध्या संगमेश्वर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून, आरोपी महिलेचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे ऑनलाइन मॅट्रिमोनियल साइट्सवरील परिचय करताना सावधगिरीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

