(रत्नागिरी / प्रतिनिधी)
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाढणाऱ्या गर्दीची पूर्वतयारी म्हणून रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ‘वायूवेग पथका’तर्फे विशेष मोहिम राबविण्यात आली. यामध्ये रत्नागिरी रेल्वे स्थानक रिक्षा स्टँड, बसस्थानक परिसर तसेच जिल्ह्यातील विविध रिक्षा स्टँडवर जाऊन रिक्षाचालकांना नियमांचे पालन करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
या मोहिमेदरम्यान रिक्षाचालकांना प्रवाशांकडून मीटरप्रमाणेच भाडे आकारणे, प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वर्तन ठेवणे, तसेच वाद टाळणे याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. नियम मोडणाऱ्यांविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याची ताकीदही अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी रिक्षाचालकांना खास करून ॲप-आधारित सेवा जसे जुगनू ॲपचा वापर करणे पूर्णपणे बंद असल्याचे सांगण्यात आले. अशा सेवा वापरणाऱ्या रिक्षाचालकांवर परवाना निलंबन व रिक्षा जप्तीसारखी कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
तसेच प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, रत्नागिरीतर्फे अधिकृत केलेल्या प्रवासी रिक्षांचे मीटर भाडे व शेअर रिक्षांच्या दराचे फलक संबंधित ठिकाणी लावण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना अधिकृत दरमाहिती मिळून फसवणूक टळणार आहे. या मोहिमेमुळे गणेशोत्सव काळात जिल्ह्यात येणाऱ्या भाविक प्रवाशांना सुरक्षित, सुसंस्कृत आणि नियमबद्ध सेवा मिळावी, हा हेतू असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

