(चिपळूण)
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. भाजप-सेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 28 जानेवारी रोजी चिपळूणमध्ये जाहीर सभा होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा अद्याप स्थानिक प्रशासनाला प्राप्त झालेला नाही.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची रत्नागिरी जिल्ह्यात सभा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
सावरकर मैदानावर सभा होण्याची शक्यता
भाजपच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, ही जाहीर सभा 28 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता चिपळूणमधील बहादूरशेख येथील सावरकर मैदानावर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कोकण दौऱ्यात एकाच दिवशी सिंधुदुर्ग, चिपळूण आणि रायगड येथे तीन सभा घेणार असल्याचेही समजते. सकाळी सिंधुदुर्ग, दुपारी चिपळूण आणि दुपारी साडेतीनच्या सुमारास रायगडमध्ये सभा प्रस्तावित असल्याची चर्चा आहे.
या संदर्भात पोलीस प्रशासनाने “दौरा जाहीर झाल्यास आम्ही तयारीत आहोत, मात्र मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा आम्हाला अद्यापतरी प्राप्त झालेला नाही,” अशी माहिती दिली. स्थानिक प्रशासनालाही अद्याप अधिकृत कार्यक्रम प्राप्त झालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, चिपळूणमधील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य दौऱ्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. प्रजासत्ताक दिनी भाजप पदाधिकाऱ्यांनी एका हॉटेलच्या सभागृहात नियोजन बैठक घेतल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री चिपळूणला येणार असल्याच्या चर्चेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आता सर्वांचे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत दौऱ्याच्या घोषणेकडे लागले आहे.

