(नवी दिल्ली)
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरप पिल्यामुळे मुलांच्या मृत्यूच्या घटनेनंतर केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने बालकांच्या मृत्यूबाबत गंभीर चिंता व्यक्त केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी केंद्र आणि राज्य संस्थांनी संयुक्तपणे तपास सुरु केला आहे.
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आतापर्यंत ११ मुलांचा मृत्यू झाल्याचे नोंदवले गेले आहे. छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथे गेल्या २० दिवसांत नऊ मुलांचा मृत्यू झाला असून, राजस्थानमध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या प्रकरणांमध्ये बहुतेकांची कारणे खोकला आणि सर्दी औषधांशी संबंधित असल्याचे प्रारंभीच्या तपासात समोर आले.
या पार्श्वभूमीवर ड्रग कंट्रोलर ऑफ ड्रग्जने तात्काळ संबंधित सिरपवर बंदी घातली आणि प्रयोगशाळेत पुढील चाचणीसाठी पाठवले. तसेच डॉक्टरांना असे सिरप मुलांना देऊ नयेत, असा सल्लाही जारी करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना खोकला आणि सर्दीसाठीचे औषध देऊ नयेत, असा महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
कफ आणि सर्दीवर प्राथमिक उपचार म्हणून नैसर्गिक उपायांना प्राधान्य देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये पुरेसे पाणी पिणे, विश्रांती घेणे आणि आधार देणारे उपाय यांचा समावेश आहे. औषधोपचार आवश्यक असल्यास, डॉक्टरांनी रुग्णाची काळजीपूर्वक तपासणी करून आणि जवळच्या देखरेखीखाली औषधे द्यावीत. डॉक्टरांनी सांगितलेल्या डोस आणि उपचाराच्या कालावधीचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. एकाच वेळी अनेक औषधे मिसळून देणे टाळावे, असेही निर्देश आहेत.
आरोग्य सेवा महासंचालनालयाने बालरोग रुग्णांमध्ये कफ सिरपचा योग्य वापर याबाबत मार्गदर्शन जारी केले आहे. ते म्हणाले, “मुलांमध्ये खोकल्याची बहुतेक प्रकरणे स्वतःहून बरी होतात. उपचारांमध्ये हायड्रेशन, विश्रांती आणि योग्य काळजी हा प्राथमिक उपाय असावा. औषध वापरताना डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी औषधांची शिफारस साधारणपणे नाही. औषधांचा वापर करताना योग्य डोस, बारकाईने देखरेख आणि संयोजन टाळणे महत्त्वाचे आहे.”
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या तपासानुसार, मृत्यू झालेल्या सिरपच्या नमुन्यांमध्ये मूत्रपिंडाला हानी पोहोचवणारे विष आढळलेले नाही. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना आणि इतर संस्थांनी छिंदवाडा येथून नमुने गोळा केले, परंतु डायथिलीन ग्लायकोल किंवा इथिलीन ग्लायकोल आढळले नाही.
केंद्र सरकारचा आरोग्य सल्ला:
- मुलांसाठी खोकल्याच्या सिरपचा वापर मर्यादित करा.
- दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना खोकला आणि सर्दीसाठीचे औषध देऊ नका.
- पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना औषध देण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- औषधांऐवजी पुरेशी विश्रांती, द्रवपदार्थ, स्टीम इनहेलेशन आणि कोमट पाणी याची व्यवस्था करा.
- मुलांमध्ये खोकल्याची बहुतेक प्रकरणे नैसर्गिकरित्या बरी होतात; औषधांशिवाय ही काळजी पर्याप्त आहे.

