(संगमेश्वर /एजाज पटेल)
संगमेश्वर बाजारपेठ परिसरात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या “बिबट्या दिसल्याच्या” चर्चेला अखेर ठोस दुजोरा मिळाला असून बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. त्यामुळे ही बाब केवळ अफवा नसून वास्तव असल्याचे उघड झाले आहे.
संगमेश्वर बाजारपेठ ही दिवसभर गजबजलेली असते. बाजारातून जाणारा अंतर्गत रस्ता असल्याने रात्री उशिरापर्यंत वाहनांची सतत ये-जा सुरू असते. अशा वर्दळीच्या, दाट लोकवस्तीच्या परिसरात बिबट्याचा वावर सुरू असल्याचे दृश्य अत्यंत धक्कादायक तसेच भितीदायक ठरत आहे.
संगमेश्वर येथील प्रतिष्ठित व्यापारी संतोष खातू यांच्या बाजारपेठेतील घराजवळ रात्रीच्या सुमारास काही काळ बिबट्या बसलेला असल्याचे दृश्य त्यांच्या घराच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये दहशत अधिकच वाढली आहे. आजूबाजूला घरे, दुकाने आणि रहिवासी वस्ती असताना बिबट्याचा असा निर्भय वावर ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.
रात्रीच्या वेळी नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत असून वाहनचालकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुठल्याही क्षणी अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चिंता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
मुक्या जनावरांच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याने जंगलातील अधिवास सोडून थेट मानवी वस्तीत प्रवेश केल्याने संभाव्य धोक्याचे गांभीर्य अधिक वाढले आहे. वनविभागाने अद्याप ठोस पावले उचललेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी वनविभागाने तातडीने हालचाली करून बिबट्याला जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासन असेच निद्रावस्थेत राहिल्यास भरून न येणारी हानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

