(संगमेश्वर / एजाज पटेल)
फुणगूस खाडी भागातील एका आदर्श शाळा पुरस्कारप्राप्त जिल्हा परिषद शाळेत सुरू असलेला धक्कादायक प्रकार सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. या शाळेची मुख्य किल्ली थेट विद्यार्थ्यांकडे देण्यात आल्याने, शिक्षक येण्यापूर्वीच विद्यार्थ्यांनाच शाळा उघडावी लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शाळा उघडून साफसफाई करून घेणे म्हणजे शिक्षण व्यवस्थेचे अपयश असून, हा प्रकार बालहक्क आणि शिक्षण हक्क कायद्याचा उघड भंग असल्याची भावना पालक व ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
गुरुजी अनुपस्थित, विद्यार्थ्यांवर जबाबदारी
सदर शाळेतील शिक्षक मुख्यालयी न राहता परतालुक्यातून ये–जा करत असल्याने त्यांच्या येण्याच्या वेळा निश्चित नसतात. परिणामी शाळा वेळेवर सुरू होत नाही. मात्र, विद्यार्थी लवकर यावेत आणि शाळा उघडावी, असा अलिखित आदेश दिला जात असल्याची चर्चा आहे. शिक्षक येईपर्यंत विद्यार्थीच शाळेचे कुलूप उघडून वर्गखोल्यांची स्वच्छता करतात, असा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
शिक्षण हक्क कायदा आणि बालहक्कांचा भंग
शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळा वेळेवर सुरू होणे, शिक्षकांची उपस्थिती आणि विद्यार्थ्यांवर कोणतीही अतिरिक्त जबाबदारी न टाकणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांकडे शाळेची किल्ली देणे म्हणजे त्यांच्यावर अप्रत्यक्ष जबाबदारी सोपवणे होय. हा प्रकार कायदेशीरदृष्ट्या गंभीर असून, बालहक्कांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करतो.
पालक व ग्रामस्थांचा तीव्र संताप
या प्रकारामुळे पालक व ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. “गुरुजी येण्याआधी शाळा उघडणे हे विद्यार्थ्यांचे काम आहे का?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. आदर्श शाळेचा पुरस्कार मिळालेल्या शाळेतच असे प्रकार घडत असतील, तर शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि प्रशासनाच्या देखरेखीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
तातडीच्या कारवाईची मागणी
या गंभीर प्रकरणाची जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी पालक व ग्रामस्थांची मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी आणि शिक्षणाच्या हक्काशी संबंधित हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही, तर त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होईल, आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शिक्षण विभागावरच येईल, असा इशाराही ग्रामस्थांकडून दिला जात आहे.

