(मुंबई)
‘नवसाला पावणारा गणपती’ ही मुंबईच्या लालबागच्या राजाची ओळख आहे. म्हणूनच मुंबई आणि मुंबईबाहेरील लोकही लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येतात. दरवर्षी लाखो लोक राजाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहतात. गणेशोत्सवात ‘लालबागचा राजा’ हे आकर्षण असलं, तरी दरवर्षी त्यांच्या दर्शन व्यवस्थेसंबंधी काही ना काही वाद होताना दिसतो. यंदा अद्याप कुठलीही गोंधळाची घटना घडली नसली, तरी व्हीआयपी आणि सामान्य दर्शनाच्या भेदाभेदावरून लालबागचा राजा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबईतील अॅड. आशीष राय आणि पंकज मिश्रा यांनी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करत, लालबागच्या राजाच्या दर्शन व्यवस्थेवर गंभीर आक्षेप घेतले आहेत.
तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की, “गणेशोत्सव हा लोकांचा सार्वजनिक उत्सव आहे. अशा उत्सवात व्हीआयपी व नॉन-व्हीआयपी दर्शनासाठी वेगळी रांग लावणं म्हणजे सामान्य भाविकांच्या भावनांचा अपमान आणि मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे.” तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सामान्य गणेशभक्तांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतं, तर काही मोजक्या व्यक्तींना ‘विशेष सवलती’तून थेट दर्शनाचा अधिकार दिला जातो. हे अन्यायकारक आहे, असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे.
दर्शन सर्वांसाठी समान असावं आयोगाकडे केलेली मागणी
राय आणि मिश्रा यांनी आयोगाकडे सादर केलेल्या तक्रारीत पुढील मागण्या केल्या आहेत: गणेशोत्सव लोकांचा असल्याने, दर्शन सर्वांसाठी समान आणि सुलभ असावं, व्हीआयपी व नॉन-व्हीआयपी दर्शन व्यवस्था तत्काळ रद्द करावी, सामान्य भाविकांना न्याय मिळावा, यासाठी स्पष्ट आणि पारदर्शक नियमावली तयार करावी
या तक्रारीची दखल घेत मानवाधिकार आयोग लवकरच संबंधित मंडळाला नोटीस पाठवण्याची शक्यता आहे. आयोगाने जर कारवाई केली, तर त्याचा परिणाम केवळ लालबागच्याच नव्हे, तर राज्यातील इतर प्रमुख गणेश मंडळांच्या दर्शन व्यवस्थेवरही होण्याची शक्यता आहे. आता आयोग काय निर्णय घेणार, याकडे सर्व गणेशभक्तांचे आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

