( कोल्हापूर )
महाराष्ट्रातील फुटबॉलच्या इतिहासात नवा अध्याय लिहिणारी घोषणा शुक्रवारी कोल्हापुरात करण्यात आली. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) चे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र फुटबॉल लीग (MFL) ची अधिकृत माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. महाराष्ट्रातील पहिली फ्रँचायझी आधारित व्यावसायिक फुटबॉल लीग मे 2026 च्या अखेरीस छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणार आहे. या लीगमध्ये राज्यभरातील 10 वरिष्ठ पुरुष संघ सहभागी होणार असून सर्व सामने एकाच मैदानावर खेळवले जाणार आहेत.
IPL-ISL धर्तीवर महाराष्ट्र फुटबॉल लीग
प्रो स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, WIFA आणि कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (KSA) यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही लीग साकार होत आहे. संकल्पना इंडियन प्रीमियर लीग (IPL) आणि इंडियन सुपर लीग (ISL) या यशस्वी मॉडेलवर आधारित आहे. पहिल्या हंगामात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह विविध शहरांचे प्रतिनिधित्व करणारे संघ मैदानात उतरतील. 20 हजारांहून अधिक प्रेक्षक क्षमता असलेले छत्रपती शाहू स्टेडियम व्यावसायिक क्रीडा स्पर्धांसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलं.
कोल्हापूरचा राष्ट्रीय फुटबॉल नकाशावर ठसा
WIFA ने यापूर्वी महाराष्ट्र स्टेट सीनियर मेन्स फुटबॉल लीग सुरू केली असून महाराष्ट्र फुटबॉल लीग हा त्याचा व्यावसायिक विस्तार आहे. शाहू स्टेडियमने संतोष ट्रॉफी आणि WIFA इंटर-डिस्ट्रिक्ट स्पर्धांचे यशस्वी आयोजन केलं आहे. 2024-25 मध्ये कोल्हापूरने या स्पर्धेत चॅम्पियनशिप पटकावली होती. या पार्श्वभूमीवर MFL मुळे कोल्हापूरची ओळख राष्ट्रीय फुटबॉल केंद्र म्हणून अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दीर्घकालीन फुटबॉल विकासाचा रोडमॅप
“महाराष्ट्र फुटबॉल लीग ही केवळ हंगामी स्पर्धा नसून पुढील पाच वर्षांसाठी शाश्वत फुटबॉल इकोसिस्टम उभारण्याचा आमचा उद्देश आहे,” असं मालोजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. या उपक्रमात जिल्हास्तरीय स्काउटिंग, प्रशिक्षण कार्यक्रम, पंच विकास, तसेच पारदर्शक खेळाडू लिलाव प्रणालीचा समावेश असेल. झी 5 आणि सोनी लिव या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. फ्रँचायझी मालकी, ट्रायल्स आणि वेळापत्रकाची घोषणा लवकरच केली जाणार आहे.
या लीगमध्ये प्रत्येक संघात कोल्हापूरमधील किमान तीन खेळाडू राखीव ठेवले जाणार आहेत. राज्यभरातून निवडलेल्या 500 खेळाडूंमधून बोली पद्धतीनं संघमालक खेळाडू निवडतील. यामुळे स्थानिक फुटबॉलपटूंना व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लीगमधून अनुभव मिळण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र फुटबॉल लीगमुळे राज्यातील फुटबॉलला नवी दिशा मिळेल आणि कोल्हापूर पुन्हा एकदा फुटबॉलच्या केंद्रस्थानी येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

