( नवी दिल्ली )
केंद्र सरकारने रविवारी २०२६ च्या पद्म पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी जाहीर होणारे हे पुरस्कार कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, सामाजिक कार्य, सार्वजनिक सेवा, विज्ञान, व्यापार, उद्योग आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिले जातात.
यंदा कर्नाटकचे अंके गौडा आणि महाराष्ट्राच्या आर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचे भागवदास रायकवार आणि जम्मू आणि काश्मीरचे ब्रिजलाल भट्ट यांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे.
१३१ पद्म पुरस्कारांना राष्ट्रपतींची मान्यता
राष्ट्रपतींनी २०२६ साठी एकूण १३१ पद्म पुरस्कारांना मंजुरी दिली आहे. या यादीत
- ५ पद्मविभूषण,
- १३ पद्मभूषण,
- ११३ पद्मश्री पुरस्कार यांचा समावेश आहे.
पुरस्कार विजेत्यांमध्ये १९ महिला असून ६ परदेशी नागरिक, एनआरआय, पीआयओ आणि ओसीआय श्रेणीतील व्यक्ती आहेत. यंदा १६ जणांना मरणोत्तर सन्मान दिला जाणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
क्रिकेटपटू रोहित शर्मा, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर भुल्लर आणि हॉकीपटू सविता पुनिया यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या सन्मानामुळे भारतीय क्रीडाक्षेत्रातील योगदानाला मोठी दाद मिळाली आहे.
पद्मविभूषण पुरस्कार
कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी दिवंगत प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल (मरणोत्तर) यांना पद्मविभूषण जाहीर झाले आहे. तसेच, के. टी. थॉमस (सार्वजनिक सेवा), सुश्री एन. रंजन (कला), पी. नारायणन (साहित्य व शिक्षण), दिवंगत व्ही. एस. अच्युतानंदन (सार्वजनिक सेवा) यांनाही पद्मविभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे.
पद्मभूषण पुरस्कार
गायिका अलका याज्ञिक, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी आणि ज्येष्ठ अभिनेता मामूट्टी यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाईल. याशिवाय उदय कोटक, विजय अमृतराज, वेल्लापल्ली नटेसन, शिबू सोरेन (मरणोत्तर) यांच्यासह अनेक मान्यवरांचा या यादीत समावेश आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध टेनिसपटू विजय अमृतराज यांनाही पद्मभूषण जाहीर झाले आहे.
पद्म पुरस्कारांविषयी
पद्म पुरस्कार भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी असून ते पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये दिले जातात. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक प्रशासन, विज्ञान, व्यापार-उद्योग, वैद्यक, साहित्य-शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा अशा क्षेत्रांतील योगदानासाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात.

