(मुंबई)
कर्जत–खालापूर येथील एन.डी. स्टुडिओत आयोजित कार्निव्हलला गुरुवारपासून उत्साहात सुरुवात झाली. विशेष मुलांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर कार्यक्रमाला भावनिक आणि आनंदी वातावरण तयार झाले. उद्घाटनानंतर अभिनेत्री कविता लाड यांच्या चित्रपट व नाट्यसृष्टीतील प्रवासावर आधारित संवाद कार्यक्रम रंगला. त्यांच्या अनुभवांच्या कथनाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत असलेल्या एन.डी. स्टुडिओत हा कार्निव्हल ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. पहिल्याच दिवशी दोनशेहून अधिक पर्यटकांनी उपस्थिती लावत कार्यक्रमाची दखल घेतली. उद्घाटनप्रसंगी प्रशासकीय अधिकारी सचिन निंबाळकर आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे उपस्थित होते.
या कार्निव्हलमध्ये पाच वर्षांपासून सर्व वयोगटांसाठी विविध उपक्रम, कलाकारांशी संवाद आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तिकीट दर ९९९ रुपये असून जेवणासह तिकीट १४९९ रुपयांना उपलब्ध आहे. एकाच वेळी २५ किंवा त्यापेक्षा अधिक तिकिटांची नोंदणी केल्यास प्रति तिकीट १३९९ रुपये आकारले जाणार आहेत. तिकीट बुकिंग ऑनलाइन www.ndartworldhttp://www.ndartworld या संकेतस्थळावर तसेच स्टुडिओ परिसरात ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे.
कलाकारांची उपस्थिती
• सुव्रत जोशी व सखी गोखले : २६ डिसेंबर, सायं. ४ ते ६
• अदिती सारंगधर : २७ डिसेंबर, सायं. ४ ते ६
• विराजस कुलकर्णी, उर्मिला कोठारे, विक्रम गायकवाड : २८ डिसेंबर, दुपारी १२
• आनंद इंगळे : २९ डिसेंबर, सायं. ४ ते ६
• डॉ. गिरीश ओक : ३० डिसेंबर, सायं. ४ ते ६
• संजय मोने : ३१ डिसेंबर, सायं. ४ ते ६
या कलाकारांसोबत संवाद आणि गप्पांचा कार्यक्रम कार्निव्हलमध्ये अनुभवता येणार आहे.

