( मुंबई )
राज्याच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर 20 जून रोजी जाहीर होणार आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने मंगळवारी याबाबत घोषणा केली. या प्रकरणातील प्रमुख आरोपी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील असून, त्यांच्यासह एकूण नऊ जणांविरुद्ध खटला सुरू आहे.
मंगळवारी निकाल लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे सकाळपासूनच सर्व आरोपी, वकील आणि संबंधित पक्ष न्यायालयात उपस्थित होते. मात्र, निकालाला अंतिम स्वरूप देण्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याचे सांगत विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नवांदर यांनी निकाल 20 जूनपर्यंत राखून ठेवला.
यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, त्यांचे बंधू जयराजे निंबाळकर, आई आनंदीदेवी निंबाळकर तसेच दिवंगत चालक समद काझी यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात हजेरी लावली होती. दुसरीकडे, मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील हे प्रकृतीच्या कारणास्तव अॅम्ब्युलन्समधून न्यायालयात दाखल झाले.
काय आहे पवनराजे निंबाळकर हत्याकांड?
3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली परिसरात सायन-पनवेल महामार्गावर पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून हत्या केली होती. या घटनेने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, पवनराजे निंबाळकर यांच्या वाढत्या राजकीय प्रभावामुळे त्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. या कटासाठी तब्बल 25 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपींवर आरोप
या प्रकरणात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण नऊ आरोपींवर हत्या आणि हत्येचा कट रचल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. सप्टेंबर 2009 पासून पद्मसिंह पाटील जामिनावर बाहेर आहेत. या खटल्यात शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे, माजी नगरसेवक मोहन शुक्ला, बसपा नेते कैलास यादव, शशिकांत कुलकर्णी, सतीश मंदाडे आणि पारसमल जैन यांचाही समावेश आहे.
या बहुचर्चित प्रकरणाचा तपास सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडे होता. मात्र, बड्या राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याच्या आरोपांमुळे तपास सीआयडीमार्फत सीबीआयकडे सोपवण्यात आला. खटल्यादरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह एकूण 128 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. पारसमल जैन याला माफीचा साक्षीदार करण्यात आले असून, त्याच्या जबाबाला या खटल्यात विशेष महत्त्व आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष आता 20 जूनकडे लागले आहे.
हत्या करून विरोधक संपत नाहीत, नवे विरोधक निर्माण होतात : ओमराजे निंबाळकर
“आम्हाला न्याय मिळावा, हीच आमची अपेक्षा आहे. एखाद्या व्यक्तीची हत्या करून राजकीय विरोधक संपत नाहीत, उलट त्यातून नवे विरोधक निर्माण होतात. त्याच जिद्द आणि संघर्षातून मी इथपर्यंत पोहोचलो आहे. माझा राजकीय जन्मच या घटनेतून झाला आहे. धाराशिव मतदारसंघातील जनतेने नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मला ताकद दिली आहे.
पवनराजे निंबाळकर आणि समद काझी यांना न्याय मिळावा, यासाठी आमचा परिवार आजही लढत आहे. सध्या आमच्या मनात एकच अपेक्षा आहे, ती म्हणजे पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाचा निकाल लवकर लागावा आणि न्याय मिळावा,” असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले. न्यायालयातून बाहेर पडताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी, “उशिरा का होईना, आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे,” अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली.

