(रत्नागिरी /प्रतिनिधी)
तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीने राजकीय वातावरण तापले असून, जिल्हा परिषदेच्या १० जागांसाठी ३७, तर पंचायत समितीच्या २० जागांसाठी ५१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शिंदेसेना–भाजप युती एकत्रितपणे निवडणूक लढवत असताना, उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरवले आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक बहुरंगी ठरण्याची चिन्हे स्पष्ट आहेत. तरीही मुख्य लढत शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्यातच रंगण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत रत्नागिरीत उद्धवसेनेने बाजी मारली होती, तर विधानसभा व नगरपरिषद निवडणुकीत शिंदेसेना वरचढ ठरली. या तिन्ही निवडणुकांमध्ये केंद्रस्थानी असलेली स्पर्धा पुन्हा एकदा या दोन सेनेतच सीमित राहिली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि मनसे या पक्षांना प्रभावी कामगिरी करता आली नाही. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत या चारही पक्षांकडे उमेदवारांची वानवा प्रकर्षाने जाणवत आहे. शिंदेसेना व उद्धवसेनेने या निवडणुकीत अनुभव आणि नव्या दमाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीतील माजी सभापती, सदस्यांना पुन्हा संधी देतानाच नव्या चेहऱ्यांनाही महत्त्व दिले गेले आहे.
महाविकास आघाडीत फूट
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिंदेसेना–भाजप युती जरी कायम असली, तरी महाविकास आघाडीत मात्र मतभेद उघड झाले आहेत. उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने आघाडीतील एकजूट दिसून येत नाही.
दोन्ही राष्ट्रवादींची अवस्था बिकट
काँग्रेस आणि मनसे प्रत्येकी एका गटात, तर वंचित बहुजन आघाडीने दोन गटांत उमेदवार दिले आहेत. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची तालुक्यातील स्थिती अत्यंत कमकुवत असून, जिल्हा परिषद गटात त्यांचा एकही उमेदवार नाही. पंचायत समितीमध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादींकडून प्रत्येकी एक उमेदवार मैदानात आहे. युतीतील मित्र पक्ष भाजपला शिंदेसेनेने पंचायत समितीत केवळ दोन जागा दिल्यानेही राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अपक्ष बंडखोरीमुळे रंगत वाढली
हातखंबा जिल्हा परिषद गटात माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांना डावलून शिंदेसेनेकडून सुयोग कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या कदम यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत बंडखोरी केली आहे. गोळप गटातही माजी उपाध्यक्ष उदय बने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने उद्धवसेनेतून बाहेर पडलेले बने आता अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्याने लढती अधिकच चुरशीच्या ठरण्याची शक्यता आहे.
एकूणच, अनेक पक्षांची विभागणी, आघाड्यांतील फूट आणि अपक्ष उमेदवारांच्या बंडखोरीमुळे रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

