(रत्नागिरी)
विकसित भारताचा मार्ग भाषा आणि सामाजिक शास्त्राच्या गुणात्मक विकासातूनच पुढे जाईल. भाषा व सामाजिक शास्त्राच्या शिक्षणातून सामाजिक मूल्यांची जडणघडण होते, लोकशाही मूल्यांची जोपासना होते आणि विकसित भारतासाठी ही बाब अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन मत्स्य अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. केतन कुमार चौधरी यांनी केले. भारताच्या सांस्कृतिक सातत्यासाठीही भाषा आणि सामाजिक शास्त्राची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
गोगटे–जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. चौधरी यांच्या हस्ते झाले. हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे ही परिषद सुरू आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विजयराव साखळकर होते, तर कार्यवाह सतीश शेवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखरकर यांनी मान्यवरांचे स्वागत करत महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत स्वायत्त अभ्यासक्रम रचनेवर प्रकाश टाकला.
डॉ. चौधरी यांनी मत्स्य विज्ञान आणि अर्थशास्त्र यांतील परस्परसंबंध स्पष्ट करत आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन मांडला. केवळ विशेषीकरणाचे दिवस संपत असून आता आंतरविद्याशाखीय अभ्यासाला महत्त्व प्राप्त झाले आहे, असे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील पुनर्प्रवेशाच्या संधीमुळे शिक्षण अर्धवट सोडलेल्या अनेकांना पुन्हा शिक्षणाची संधी मिळणार असून, त्यातून कुशल मनुष्यबळ तयार होईल आणि विकसित भारताचा मार्ग अधिक सुकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गुणात्मक संशोधन ही विकसित भारताची पूर्वअट असून संशोधन अनुदानाच्या रकमेत वाढ होत असल्याचे वास्तव त्यांनी अधोरेखित केले. उच्च शिक्षणातील या बदलांना सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहनही त्यांनी केले. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने संज्ञात्मक ज्ञानाचा विकास होतो, संकल्पनांची स्पष्टता येते आणि भावना व संस्कृतीशी नाते जोडले जाते, त्यामुळे आकलन अधिक सुलभ होते. याचा परिणाम म्हणून ग्रामीण व आदिवासी भागातील उच्च शिक्षणातील प्रवेशदर वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्कृत आणि प्राचीन भाषा या भारतीय सभ्यतेच्या वाहक असून त्या आत्मविश्वास देतात आणि सर्व भारतीयांना जागतिक स्तरावर नेतृत्वाची संधी निर्माण करून देतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. भाषिक कौशल्यवृद्धीमुळे रोजगाराच्या संधी वाढतील, तर सामाजिक शास्त्राच्या अभ्यासातून संविधानिक मूल्यांची जाणीव, जबाबदार नागरिकत्व आणि नैतिक नेतृत्व घडेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. शाश्वत लोकशाहीसाठी भाषा आणि मानव्यविद्यांची नितांत गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

