(जाकादेवी / वार्ताहर)
बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या वादळी पाऊस, वीजा आणि ढगांच्या गडगडाटामुळे निवळी–चाफे ३३ केव्ही मुख्य लाईन फॉल्टी झाली होती. या बिघाडामुळे जाकादेवी, चाफे, मालगुंड, गणपतीपुळे, नेवरे, खंडाळा, जयगड, सैतवडे या परिसरातील वीजपुरवठा तब्बल ८ ते ९ तास खंडित झाला होता. वादळ आणि मुसळधार पावसाच्या परिस्थितीत २२ किलोमीटर अंतरावरील लाईनमधील बिघाड शोधणे आणि दुरुस्ती करणे हे महावितरणच्या पथकासमोर मोठे आव्हान होते.
वादळातही जीवाची पर्वा न करता सेवा
अवघड हवामान असूनही महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उपाशीपोटी, रात्री अपरात्री पेट्रोलिंग करत निवळी ते चाफे लाईनची तपासणी केली.
सुमारे रात्री १२.३० वाजता फॉल्ट शोधण्यात आला आणि रात्री १ वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात कर्मचाऱ्यांना यश आले.
वादळी परिस्थितीत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे निवळी, जाकादेवी, मालगुंड, खंडाळा परिसरातील वीज ग्राहकांकडून मनःपूर्वक कौतुक करण्यात आले.
महावितरणच्या जाकादेवी, मालगुंड आणि खंडाळा शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्थानिक नागरिक आणि ग्राहकांनी मनस्वी आभार मानले. तसेच, वीजपुरवठा खंडित असताना संयम राखल्याबद्दल महावितरणतर्फे सर्व ग्राहकांचेही विशेष अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यात आले.

