(चिपळूण / प्रतिनिधी)
शहरालगतच्या पेढे–वडकर कॉलनी परिसरात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी गुरुवारी (दि. २२) सकाळी साडेसातच्या सुमारास लक्षात आली असून, या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भास्कर उमाजी मंडले (वय ३६) हे पेढे–वडकर कॉलनीतील एका इमारतीत भाड्याने वास्तव्यास आहेत. अज्ञात चोरट्याने त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडी–कोयंडा कोणत्यातरी धारदार हत्याराच्या साहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटात ठेवलेली सुमारे २७ हजार ७५० रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ चोरून नेण्यात आली. याच इमारतीतील पहिल्या मजल्यावर राहणारे संजय पवार यांच्या फ्लॅटचाही दरवाजाचा कडी–कोयंडा तोडून घरफोडी केल्याचे समोर आले आहे. सुदैवाने त्या ठिकाणी मोठे नुकसान झाले नसले, तरी सलग दोन फ्लॅट्समध्ये झालेल्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेप्रकरणी भारतीय न्यायसंहिता कायदा, २०२३ अंतर्गत कलम ३०५ (क) व ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

