(रत्नागिरी)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (MSRTC) ७७ वा वर्धापन दिन आणि कोकण एसटी प्रेमी ग्रुपचा ९ वा वर्धापन दिन रत्नागिरी आगारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या विशेष प्रसंगी आगारात केक कापून वर्धापन दिनाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमास रत्नागिरी आगाराचे आगार व्यवस्थापक संदीप पाटील, स्थानक प्रमुख सतीश सावंत, संजय रसाळकर, कीर मॅडम, बाळासाहेब आडसुळे, तसेच कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे सदस्य फरान होडेकर आणि आगारातील चालक व वाहक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एसटी महामंडळाची स्थापना १ जून १९४८ रोजी बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या नावाने झाली होती. त्या दिवशी पुणे ते अहमदनगर मार्गावर पहिली बस धावली. ती बस चालक तुकाराम पांडुरंग पठारे आणि वाहक लक्ष्मण केवटे यांच्या हातून चालवली गेली होती.
त्या काळातील पहिल्या एसटी बसची बॉडी लाकडी होती, तर छप्पर कापडाचे होते. आसनक्षमता फक्त ३० प्रवाशांची होती. पुढे शेवरले, फोर्ट, बेडफोर्ड, सेडान, स्टडेबेकर, मॉरिस कमर्शिअल, अल्बिओन, लेलँड, कोमर आणि फियाट या कंपन्यांच्या बसगाड्या महामंडळात दाखल झाल्या.
आजच्या दिवशी एसटीचे गौरवशाली इतिहास आठवून कर्मचाऱ्यांनी अभिमान व्यक्त केला. कोकण एसटी प्रेमी ग्रुपच्या सदस्यांनीही एसटीच्या या सेवेचा सन्मान करत भविष्यात अधिक चांगल्या सेवा आणि सहभागाचे आश्वासन दिले.