(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी धरणाजवळील रस्ता सध्या धोकादायक स्थितीत असून प्रवाशांसाठी तो मृत्यूचा सापळा ठरत आहे. धरणाची उंची वाढवून रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम गतवर्षी पूर्ण झाले होते. मात्र सध्या पावसामुळे धरणाचा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढल्याने आणि पाण्याचा तीव्र वेग असल्याने रस्त्याच्या कडेकडची माती घसरत आहे. त्यामुळे रस्ता कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.
सदर मार्ग हा कळझोंडी धरण मार्गे वरवडे वरचे व वरवडे खालचे मालगुंडमार्गे गणपतीपुळे येथे जात असल्याने येथे सतत प्रवाशांची मोठी वर्दळ असते. अशा वेळी पावसाचा जोरदार मारा आणि नदीला आलेल्या पुराच्या तडाख्यामुळे रस्त्याच्या बांधणीला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
ग्रामस्थ व प्रवाशांनी मागणी केली आहे की, संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून रस्त्याची डागडुजी करावी. तसेच कळझोंडी धरणाची सीमारेषा निश्चित करून कंपाऊंड वॉल बांधावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामस्थांच्या मते, कंपाऊंड वॉल उभारल्यास धरणाच्या बाजूने जाणारा रस्ता पावसामुळे खचणार नाही आणि धरणाच्या पाण्याच्या तडाख्यापासूनही सुरक्षित राहील. याशिवाय, धरणाला कंपाऊंड वॉल बांधल्यास धरणाच्या सौंदर्यातही भर पडेल, असे स्थानिकांचे मत आहे.